कार्यकर्ता हीच त्यांची सुरक्षितता

वाई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खास सुरक्षेची गरज नाही. कार्यकर्ता हीच त्यांची सुरक्षितता आहे, अशा शब्दात भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या बडय़ा नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केल्याची खिल्ली उडवली.

खासदार गिरिश बापट आज सातारा जिल्ह्य़ाचा तालुकानिहाय ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आले होते. यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. ते म्हणाले, सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप प्रभावीपणे उतरली असून अनेक ठिकाणी आमचे सदस्य बिनविरोध आलेले आहेत.

आम्ही सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानत नाही. आमदार रोहित पवार यांनी बिनविरोध ग्रामपंचायतींना पैसे देत आहेत, तसे भाजपकडून काय दिले जाणार आहे, या प्रश्नावर श्री. बापट म्हणाले, राष्ट्रवादीकडे पैसा आहे. त्यामुळे ते पैसा देऊन स्वागत करतात. आम्ही बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले आहे.

भाजपच्या बडय़ा नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत राज्य सरकारने कपात केली आहे. या संदर्भात श्री. बापट यांना विचारले असता ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खास सुरक्षेची गरज नाही. कार्यकर्ता हीच त्यांची सुरक्षितता आहे.