बंदी घालण्यात आलेल्या सीमी या दहशतवादी संघटनेचा कट्टर जाकेर हुसेन याच्या बनावट आधारकार्ड प्रकरणाचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नांदेड पोलीस यंत्रणा हलली खरी पण ‘हद्दी’च्या कारणावरून या प्रकरणाची चौकशी थांबली असल्याचे सांगण्यात आले.
मध्य प्रदेशातल्या खांडवा कारागृहातून पसार झालेला व नांदेडचा जावई जाकेर हुसेन याला नांदेड शहरातल्या देगलूर नाका परिसरातून अन्य नावाने बनावट आधारकार्ड मिळाले. दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणाची इत्थंभूत माहिती घेतली. शिवाय मध्य प्रदेशातल्या न्यायालयाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांची साक्षही नोंदवली. गंभीर प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस अधीक्षक परमजितसिंह दहिया यांनी इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. कंकाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मूळ प्रकरणाची चौकशी करण्याऐवजी घटना कोणाच्या हद्दीत घडली याचाच माग काढला आणि हे संपूर्ण प्रकरण सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकली. विशेष बाब म्हणजे पोलीस अधीक्षकांनीही या गंभीर प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्याला केवळ तोंडी सूचना केल्या. तोंडी सूचना फारशा गांभीर्याने घ्यायच्या नसतात असा पायंडा जणू अलीकडच्या काळात पडला आहे. त्याचाच कित्ता इतवारा पोलिसांनी समर्थपणे गिरविला.
चौकशी सुरू करण्याआधीच इतवारा पोलिसांनी हद्दीचे कारण दाखवत हे प्रकरण सिडको पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पोलीस अधीक्षक शासकीय कामानिमित्त मुंबईला आहेत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुट्टीवर आहेत तर अन्य काही वरिष्ठ अधिकारी मुंबईला गेल्याचे सांगण्यात आले. या पाश्र्वभूमीवर या गंभीर प्रकरणाकडे सर्वानीच दुर्लक्ष केले आहे. बनावट आधारकार्ड काढताना म. जाकेर यांनी आपले नाव सईद खान सलीम खान असे दाखविले आहे. हामदिया कॉलनी परिसरातल्या खुदबईनगर येथील रहिवासी असल्याचे त्याने आधारकार्ड काढण्यापूर्वी दिलेल्या माहितीपत्रकात नमूद केले आहे. एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असली तरी नांदेड पोलिसांनी मात्र या प्रकरणाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे.
शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे यांनी नांदेड पोलिसांच्या उदासीनतेबद्दल खेद व्यक्त केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Feb 2015 रोजी प्रकाशित
बनावट आधारकार्ड प्रकरणी हललेली यंत्रणा ‘हद्दी’च्या कारणावरून अडली!
बंदी घालण्यात आलेल्या सीमी या दहशतवादी संघटनेचा कट्टर जाकेर हुसेन याच्या बनावट आधारकार्ड प्रकरणाचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नांदेड पोलीस यंत्रणा हलली खरी पण ‘हद्दी’च्या कारणावरून या प्रकरणाची चौकशी थांबली असल्याचे सांगण्यात आले.

First published on: 27-02-2015 at 01:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake aadhar card stop in area