राज्य कारागृह विभागाच्या पोलीस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या नावाने बनावट फेसबूक खाते तयार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. साठे यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.

साठे यांचे फेसबुकवर खाते आहे. मात्र, त्यांच्या नावाने आणखी एक फेसबुक खाते अज्ञात व्यक्तीने उघडल्याचा प्रकार साठे यांच्या शुक्रवारी निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. साठे यांच्या फेसबुक खात्यावर असलेली गणवेशातील त्यांची छायाचित्रे बनावट खात्यावर टाकण्यात आली आहेत. साठे यांनी तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर सायबर गुन्हे शाखेकडून तातडीने बनावट फेसबुक खाते उघडणाऱ्याचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, तोपर्यंत साठे यांचे बनावट खाते बंद करण्यात आल्याचे सायबर गुन्हे शाखेच्या निदर्शनास आले. सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

या संदर्भात साठे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, फेसबुकवर बनावट खाते उघडल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिला असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.