काँग्रेस व भारतीय जनता पक्ष हे एकमेकांविरोधात लढत असले, तरी दोघेही भांडवलदारांचे हितरक्षक आहेत, अशी टीका करतानाच केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या काळातच महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या, असा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी केला.
भाकप व डाव्या लोकशाही आघाडीचे उमेदवार राजन क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ पालम येथे आयोजित जाहीर सभेत पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी शेकापचे राज्य खजिनदार भाई लक्ष्मणराव गोळेगावकर होते. काशिनाथराव जाधव, शेख मासूम खाँ उपस्थित होते. पाटील म्हणाले की, शेतीमालास योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यास काँग्रेसएवढेच भाजपही जबाबदार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून भाजपकडे सत्ता परिवर्तन होऊन चालणार नाही, तर सामाजिक परिवर्तन झाले पाहिजे.
गोळेगावकर यांनी, भाजप व काँग्रेसच्या भूलथापांना बळी न पडता क्षीरसागर यांना मत देण्याचे आवाहन केले. संसदेत गेल्यानंतर कामगार व कष्टकरी जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे ते म्हणाले. प्रा. उद्धव निर्वळ यांनी सूत्रसंचालन केले.
डाव्या पक्षांना मत द्या – पानसरे
कोणतीच धोरणे नसलेल्या, भ्रष्ट व दलबदलू काँग्रेस-राष्ट्रवादी व सेना-भाजप यांना मते देऊ नयेत. श्रमिक वर्गाशी बांधीलकी, तसेच महागाई व भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याची इच्छाशक्ती असलेल्या डाव्या विचारांच्या पक्षालाच मत द्या, असे आवाहन गोिवद पानसरे यांनी केले. दैठणा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. माधुरी क्षीरसागर, संदीप सोळुंके यांचीही भाषणे झाली. उमेदवार क्षीरसागर यांनी, मतदारसंघात ठिकठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेची मिलीभगत असल्याचा आरोप केला.



