सरसकट कर्जमाफीची मागणी कायम
राज्य सरकारने दीड लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफीच्या घेतलेल्या निर्णयचा केवळ १५ टक्केच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कर्जमाफीसाठी अजूनही पैशांची आवश्यकता असून, राज्य सरकारच्या कर्जमाफीचा निर्णय सुकाणू समितीला मान्य नाही. मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय बदलून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, त्यांनी तसे न केल्यास पंढरपुरात बळिराजा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजा करू देणार नाहीत, असा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील-घाटणेकर यांनी दिला.
कराड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील, अध्यक्ष पंजाबराव पाटील, नितीन पाटील, भीमाशंकर बिराजदार, साजिद मुल्ला उपस्थित होते.
घाटणेकर म्हणाले, की दरवर्षी आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरच्या पांडुरंगाची शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. या वर्षी त्यांना ही शासकीय पूजा करू देणार नाही. त्यांनी पोलिसांचा वापर करून देवपूजा करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना बळिराजाचा उद्रेक पाहावा लागेल. राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी तीव्र आंदोलने केली. मात्र, त्यांना निराशाजनक कर्जमाफी दिली गेली. कर्जमाफी देताना अनेक निकष लावले आहेत. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणे गरजेचे होते. तसेच सुकाणू समितीच्या काही मागण्याही मान्य करायला हव्या होत्या. मात्र, त्यांनी तसे केले नाही. उलट त्यांनी व राज्य सरकारने शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचे ३० जून २०१७ पर्यंतचे चालू आणि थकीत कर्ज माफ केले पाहिजे.
दुधाच्या किमतीपैकी सत्तर टक्के वाटा उत्पादकाला मिळाला पाहिजे. यासह इतर मागण्यांसाठी ९ जुलैपासून २३ जुलैपर्यंत सुकाणू समितीच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी मेळावे घेण्यात येणार आहेत. त्यानंतर २६ जुलैला पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. पंजाबराव पाटील म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी. जोपर्यंत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करीत नाहीत, तोपर्यंत संघर्ष करीतच राहणार आहोत. शेतकऱ्यांना कसे फसवायचे हे सदाभाऊंकडून शिकावे अशी टीका त्यांनी केली. बी. जी. पाटील म्हणाले, की ऊसदर आंदोलनासाठी शेतकरी संघटनेतून एके काळी लढलेले सदाभाऊ खोत आज मंत्रिपद मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आंदोलनावेळी सरकारबरोबर उभे राहत आहेत. हे सदाभाऊ शेतकऱ्यांचे बोगस नेते आहेत.