रास्ता रोको, आठवडे बाजार बंद * आठ जूनला नाशिकमध्ये राज्यस्तरीय परिषद
सरसकट कर्जमाफीसह इतर मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार नाशिक येथे रविवारी ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेतकऱ्यांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला. पाच जूनचा महाराष्ट्र बंद शांततामय मार्गाने करण्याचे आवाहन बैठकीत करतानाच संपाच्या परिणामासह इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी सहा जूनला मुंबईत सुकाणू समितीची आणि त्यानंतर आठ जूनला नाशिक येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या राज्यातील सर्व संघटनांच्या प्रमुखांची परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, संपाच्या चौथ्या दिवशीही रविवारी रास्ता रोको, सरकार आणि फुटीरतावाद्यांच्या निषेधार्थ सभा, रस्त्यावर दूध ओतणे, आठवडे बाजार बंद असे प्रकार झाले.
शुक्रवारी मध्यरात्री मुंबईत किसान क्रांतीच्या समितीबरोबर मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यावर त्याचे तीव्र पडसाद शनिवारी सर्वत्र उमटले. संपासंदर्भातील पुढील भूमिका ठरविण्यासाठी रविवारी नाशिक येथील बाजार समितीत डॉ. मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत सोमवारचा महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासह संप काळात शेतकऱ्यांवर ठिकठिकाणी दाखल गुन्हे मागे घ्यावेत, आश्वासन न देता मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य कराव्यात, आठ जून रोजी नाशिक येथे राज्यव्यापी परिषद घेणे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या शेतकऱ्यांविषयक विधानाचा निषेध असे ठराव संमत करण्यात आले. डॉ. मुळीक यांनी सोमवारी बंदच्या दिवशी रस्त्यावरून एकही वाहन जाऊ देऊ नका, शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसह तसेच सहकुटुंब बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन केले. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांना कायद्याचे अधिष्ठान निर्माण करण्यासाठी दबाव आणण्याची सूचना केली.
ज्येष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील यांनी शेतकऱ्यांच्या नादाला लागाल तर राजकीय भविष्यकाळ अंधकारमय होईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला. अजित नवले यांनी शेतकऱ्यांसाठी राज्य पातळीवर काम करणाऱ्या संघटनांमधील प्रतिनिधींचा समावेश असलेली एक सुकाणू समिती स्थापन करण्यात येईल, असे नमूद केले. मंगळवारी मुंबईत होणाऱ्या समितीच्या बैठकीत संपाच्या परिणामासह इतर विषयांवर चर्चा करण्यात येईल. त्यानंतर आठ जूनला नाशिक येथे राज्यव्यापी परिषदेत संपासंदर्भात पुढील भूमिका स्पष्ट करण्यात येईल अशी माहिती दिली.
राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी केवळ शेतकरी म्हणून आंदोलनात उतरण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. राजू देसले, गोकुळ काकड यांनीही मार्गदर्शन केले.
दरम्यान, संप मागे घेण्याची घोषणा करणाऱ्यांना फुटीरतावादी घोषित करून त्यांच्या निषेधार्थ नगर जिल्ह्य़ातील पुणतांबा येथे शेतकऱ्यांनी मुंडन केले. जिल्ह्य़ात पाच ते सहा ठिकाणी दूध ओतून देण्याचे प्रकार घडल्याने दूध संकलनाचे काम बंद करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्य़ातून होणारा २० लाख लिटर दुधाचा पुरवठा बंद झाला. दुधाच्या वाहनांना संरक्षण देण्यासाठी पोलीस बळ कमी पडत असल्याचा फायदा शेतकरी घेत असल्याने वाहतूकदारही तयार होत नसल्याचे दिसून आले. नगरसह नाशिक जिल्ह्य़ातील अनेक ठिकाणचे आठवडे बाजार रविवारी भरलेच नाहीत.
नाशिक जिल्ह्य़ात ठिकठिकाणी सरकारची अंत्ययात्रा, रास्ता रोकोचे सत्र सुरूच राहिले. दळवट, आसखेडा, गवंडगाव, नगरसूल, अंदरसूल येथे रास्ता रोको करण्यात आला. सायगाव येथे सरकारची अंत्ययात्रा काढण्यात आली. येवला तालुक्यातील गवंडगाव येथे सकाळी आक्रोश सभा घेण्यात येऊन नंतर सरकारची अंत्ययात्रा काढण्यात आली. देवळा येथे निषेध सभा घेण्यात येऊन शेतकऱ्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सभेनंतर तालुक्यातील माळवाडी येथील शेतकरी दिलीप शेवाळे व सरस्वतीवाडी येथील धना आहेर यांनी आपल्या शेतातील काकडी व टोमॅटोचे मोफत वाटप केले.
कळवण तालुक्यात गोळीबार
कळवण तालुक्यातील दळवट येथे शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सुमारे ३०० जणांच्या जमावाने गुजरातकडे जाणारा कांद्याचा ट्रक अडवून संपूर्ण कांदा रस्त्यावर ओतला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यावेळी जमावाच्या दगडफेकीत तीन ते चार पोलीसही जखमी झाले. जमाव पांगत नसल्यामुळे हवेत गोळीबार केला. पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, उपअधीक्षकांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांना व्यापाऱ्यांना मदत करण्यापेक्षा त्यांना गाडय़ा न भरण्याचा सल्ला देण्याचा आग्रह केला. परंतु, टोमॅटो भरलेली १५ ते २० वाहने पोलीस बंदोबस्तात गुजरात सिमेपर्यंत रवाना करण्यात आली.
शेतकरी आंदोलनाचे पुढील स्वरूप
* पाच जून रोजी महाराष्ट्र बंद
* सहा जून रोजी मुंबईत सुकाणू समितीच्या बैठकीत संपाच्या परिणामावर चर्चा
* आठ जूनला नाशिक येथे पुढील भूमिका घेण्यासंदर्भात प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी परिषद
रविवारी पहाटेपासून मुंबईकडे काही प्रमाणात फळे, शेतमाल रवाना करण्यात आल्याची माहिती नाशिक जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. दुधाचे ८४ टँकर, १२५ ट्रक भाजीपाला, ४१ ट्रक कांदा तसेच नऊ ट्रक फळे व अन्नधान्याची वाहतूक करण्यात आली. घोटी, कनाशी, मनमाड येथे रविवारी बाजार सुरू राहिल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली. रविवारी बाजार समित्याचे व्यवहार सुरू ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. परंतु, तुरळक अपवाद वगळता शेतकऱ्यांनी मालच न आणल्याने बहुतांश समित्याचे व्यवहार बंदच राहिले.