आर्वी ते दिल्ली अश्या सायकल रॅलीला ९ सप्टेंबर रोजी सुरूवात झाली होती. प्रहारचे संस्थापक व राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली होती. सलग अकरा दिवसाचा प्रवास करून शेतकरी गाझीयाबाद मार्गे दिल्लीला पोहोचले. पन्नास शेतकऱ्यांच्या चमूपैकी पंधरा शेतकरी प्रकृती बिघडल्याने माघारी फिरले. उर्वरीत ३५ शेतकऱ्यांनी दिल्ली गाठली. 

शेतकरी आंदोलनस्थळी पोहोचल्यावर त्यांचे स्थानिक शेतकरी संघटनेने आपुलकीने स्वागत केल्याची माहिती संघटना नेते बाळा जगताप यांनी दिली. काही शेतकऱ्यांनी आपली आपबिती सांगितली. कृषी कायदे रद्द करावे, ही एक मोठी मागणी आहे. त्यासोबतच बाजार समित्या मजबूत कराव्या, स्वामीनाथन आयोग लागू व्हावा व उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा, अश्या आंदोलकांच्या मागण्या आहे. या कायद्यामूळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष असल्याचे दिसून आले. कृषी कायदे जर मागे घेतले नाही तर सरकारच्या अस्तीत्वाचाच प्रश्न निर्माण होणार असल्याची स्थिती दिसून आली. कायदे रद्द होत नाही तोपर्यत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांचा असून त्याला आमचे पूर्ण समर्थन असल्याचे प्रतिपादन बाळा जगताप यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकऱ्यांनी प्रवासात वरुड, मुलताई, बैतूर, भोपाळ, धौलपूर, पलवल या ठिकाणी मुक्काम केला होता. मुलताईचे माजी आमदार सुनीलम यांनी संपूर्ण मध्यप्रदेशच्या प्रवासात शेतकऱ्यांना सहकार्य केले. भोपाळ येथे रॅलीच्या मार्गावरून पोलीसांशी झालेला वाद चर्चेअंती निवळला. उन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता शेतकरी सायकलने दिल्लीत पोहोचून आंदोलकांशी संवाद साधण्यात यशस्वी ठरल्याने श्रमाचे फळ मिळाल्याची भावना संघटनेने व्यक्त केली.