छापासत्रामुळे बाजारात भीतीचे वातावरण

प्राप्तीकर विभागाने कांदा व्यापाऱ्यांची सुरू केलेल्या चौकशीमुळे जिल्ह्यातील घाऊक बाजारातील दर घसरल्याचा आरोप करत गुरूवारी ताहाराबाद-मालेगाव राज्यमार्गावर शेकडो शेतकऱ्यांनी ठिय्या देऊन निषेध नोंदविला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जायखेडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व नायब तहसीलदार यांना निवेदन दिले.

दोन वर्षांपासून कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत होता. त्यावेळी केंद्र सरकारची एकही समिती कांदा या पध्दतीने विक्री होत असल्याची पाहणी करण्यासाठी आली नव्हती. जिल्ह्यात कांदा चाळींची संख्या हजारोंच्या घरात आहे. या चाळींची साठवण क्षमता २५ टन इतकी आहे. व्यापाऱ्यांच्या गोदामात तपासणी करताना शेतकऱ्यांकडील मालाचाही विचार करायला हवा, याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले. शासनाला दर वाढल्यावर काळजी वाटते. परंतु, भाव कोसळल्यावर सरकार निद्रिस्त भूमिका स्वीकारते, असा आरोपही शेतकऱ्यांनी केला. शासनाला ग्राहकांची इतकी काळजी असल्यास कांद्याला दोन हजार रुपये हमीभाव जाहीर करावा अशी मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान, वर्षभरापासून कांद्याचे भाव घसरत आहे. या हंगामात ऑगस्ट महिन्यात त्याने प्रथमच प्रति क्विंटलला दोन हजाराचा टप्पा ओलांडला होता. दरम्यानच्या काळात सरकारने साठेबाजांवर कारवाईचे संकेत दिल्याने भाव पुन्हा खाली आले. १८ ऑगस्टला २२०० रुपयांवर असणारे दर सध्या १५१० रुपयांवर आले आहेत. केंद्र सरकार समिती पाठवून, छापासत्र अवलंबून घाऊक बाजारात भीतीचे वातावरण निर्माण करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.