नीलेश पवार

आता पुन्हा शहरात कधीच कामाला जाणार नाही. यापुढे गावातच उदरनिर्वाह करणार, अशी हताश भावना नाशिक ते नंदुरबार अशी सव्वादोनशे किलोमीटर पायपीट करून जिल्ह्य़ात पोहचलेल्या मजुरांनी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये पैसे नसल्याने दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाल्याने आणि कंपनीतील ठेकेदाराने मदत करण्यास नकार दिल्याने दोन दिवस उपाशीपोटी पायी प्रवास करुन या मजुरांनी नंदुरबार गाठले. जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी केली.

करोनामुळे टाळेबंदी जाहीर करण्यात आल्याने मजुर आणि हातावर पोट असणाऱ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत. नाशिकहून नंदुरबार जिल्ह्यातल्या मोलगीच्या दिशेने सात कामगार येत असल्याची माहिती लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांना मिळाली. हे मजूर आल्यावर त्यांची व्यथा ऐकून सर्वच सुन्न झाले. नाशिकच्या एका कारखान्यात मजूर म्हणून काम करणारे हे सात जण मूळचे अक्कलकुवा आणि अक्राणी या दुर्गम तालुक्यातील रहिवासी आहेत. गावाकडे हातांना काम नसल्याने वर्षभरापूर्वीच त्यांनी कामासाठी नाशिक गाठले होते. टाळेबंदीमुळे कारखाना बंद झाल्याने सातही जणांवर उपासमारीची वेळ आली. नाशिकच्या दत्तमंदीर परिसरात राहणाऱ्या या मजुरांना पुढे घरभाडय़ाचे पैसेही देणे शक्य होणार नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी कंपनीच्या ठेकेदाराकडे पैशांची मागणी केली. त्यांनीही असमर्थता दर्शविल्याने शेवटी घराकडे परतण्याखेरीज मार्ग नसल्याचे या मजुरांच्या ध्यानात आले.

परतीसाठी कोणतेही साधन नसल्याने पहाटेच आदिवासी मजुरांनी नंदुरबारच्या दिशेने पायी प्रवास सुरु केला. देवळा तालुक्यात एका बिस्कीटच्या पुडय़ावर सातही मजुरांनी  रात्र काढली. पोटापेक्षाही घरी पोहचण्याची भूक अधिक तीव्र असल्याने दुसऱ्या दिवशी सातही मजुर नंदुरबारमध्ये दाखल झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी खेरीज त्यांना गावात प्रवेश मिळणार नसल्याने पायपीटीच्या त्रासापेक्षा तपासणीत काय निघेल, याची त्यांना अधिक चिंता होती. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांनी सर्वप्रथम त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली.

दरम्यान लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी या मजुरांविषयी जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड आणि आमदार डॉ. विजयकुमार  गावित यांना माहिती दिली. त्यांनी योग्य ती दखल घेत नंदुरबारपासून मोलगीपर्यत सर्व मजुरांना पोहचविण्यासाठी वाहन व्यवस्था केल्याने पुढील सुमारे शंभर किलोमीटरची त्यांची पायपीट वाचली. या सात मुजरांप्रमाणेच नाशिक, सुरत, अंकलेश्वर, बडोदा आणि अहमदाबाद या शहरांमधून अशाच पद्धतीने पायपीट करुन नंदुरबार गाठणाऱ्या मजुरांची संख्या दिवसेगणिक वाढतच आहे.