scorecardresearch

संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त लिखाण करणाऱ्या शुभा साठेंवर गुन्हा दाखल करा-आव्हाड

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुभा साठेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

संग्रहित छायाचित्र
छत्रपती संभाजी राजा दारुच्या कैफात आणि कलुशाच्या जाळ्यात सापडला होता अशी वादग्रस्त ओळ डॉक्टर शुभा साठे यांनी त्यांच्या समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात लिहिली आहे. सर्व शिक्षा अभियानात या पुस्तकाचा समावेश आहे. या प्रकरणी शुभा साठेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशीही मागणी आव्हाड यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण?
सर्व शिक्षा अभियानात ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकाचा समावेश असून हे पुस्तक डॉ. शुभा साठे यांनी लिहिले आहे. पुस्तकाचे प्रकाशन नागपूरमधील लाखे प्रकाशनाने केले आहे. या पुस्तकातील पान क्रमांक १८ वर संभाजी महाराजांविषयी उल्लेख आहे. ‘रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या- खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले’, असा उल्लेख या पुस्तकात आहे.

या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहेच. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुभा साठेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी असे म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: File complaint against shubha sathe for insult of sambhaji maharaj via her book says jitendra awhad