विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आठवडा उलटला तरी राज्यातील सत्तास्थापनाच्या वाटाघाटी मात्र अद्यापही पूर्ण होताना दिसत नाही. भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या मुख्यमंत्रिपद आणि महत्त्वाच्या खात्यांवरून वाद सुरू आहेत. शिवसेनेकडून अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणीही करण्यात येत आहे. अशातच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला टोला हाणला आहे. देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिकच आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेलाच दिलं आहे, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेला टोला लगावला.
दरम्यान, येत्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, तसंच भाजपा शिवसेनेचा एकत्र शपथविधी होईल, असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले. ‘नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे’ असं म्हणतं शिवसेना आमच्यासोबत येईल. लग्नाची बोलणी आणि खातेवाटप माध्यमांसमोर बोलू नये असंही ते विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. दरम्यान, सत्तावाटपाबाबत आमची चर्चा सुरू आहे. परंतु शिवसेना ही १३ पेक्षा अधिक खात्यासांठी पात्र आहे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
Sudhir Mungantiwar, BJP on reports of ‘proposal of 13-26 formula’ by BJP to Shiv Sena for government formation in Maharashtra: We are still to discuss all these things but what I can say is Shiv Sena deserves more than 13. (file pic) pic.twitter.com/8Hm2fzsE4n
— ANI (@ANI) October 31, 2019
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०-५० टक्क्यांच्या फॉर्म्युलावर कधी चर्चा झाली नसल्याचं सांगितलं होतं. फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर कधीही चर्चा झाली नाही, असे जर मुख्यमंत्री बोलत असतील तर आपल्याला सत्याची व्याख्याच बदलावी लागेल, अशा शब्दांत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. शिवसेनेच्या मागणीलाही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट नकार देत मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला होता. यानंतर शिवसेनेने सत्तास्थापन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली बैठक रद्द केली होती.
आणखी वाचा- ‘विनाशकाले विपरीत बुद्धि’ ही अवस्था भाजपाचीच शिवसेनेची नाही : राऊत
राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार असा दावा करीत भाजपाने शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १३ मंत्रीपदांची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली होती. तसंच मुख्यमंत्रिपदासह गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल ही खाती कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडेच राहतील असेही भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.