वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील मीनल मॉल किराणा दुकानाला भीषण आग लागली. या आगीत दुकान मालकाच्या आईचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत कोट्यवधी रुपयांच नुकसान झालं आहे. हिंगणघाट येथील विजय मुथा यांच्या मालकीचं हे दुकान आहे. याच दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर मुथा कुटुंब राहतं.
पहाटेच्या सुमारास दुकानात अचानक आग लागली. धुरामुळे आग लागली असल्याचं कुटुंबीयांना कळालं आणि घरात धावपळ सुरु झाली. बाहेर पडण्यासाठी तळमजल्याला असणारे शटर हा एकच मार्ग होता. पण तिथे आग पसरली असल्या कारणाने घरातील लोकांनी पहिल्या मजल्यावरुन खाली उडी घेतली.
महिलांना वाचवण्यासाठी घरातील इतर सदस्यांनी त्यांना खाली फेकले आणि खाली उभ्या असलेल्या सदस्यांना त्यांना झेलले. यामध्ये अनेकजण जखमी झाले असून कुटुंबातील आठ सदस्य सुखरूप आहेत. यामध्ये विजय मुथादेखील थोडे जखमी झाले असून त्यांची आई शांताबाई मुथा या आगीतच अडकून राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला.
आग विझल्यानंतर घरात पडलेलं प्लास्टर ऑफ पॅरिस हटवून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पाच ते सहा तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं. शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.