कर्जत शहरात मध्यरात्री यशांजली रेडीमेड, वर्धमान सिलेक्शन व गुगळे क्लॉथ स्टोअर्स या तीन मोठया कापड दुकानांसह डी एस टेलर्स व शारदा मेडिकल या पाच दुकानांना अचानक आग लागली. यामध्ये यशांजली वर्धमान व डी. एस. टेलर ही दुकाने आगीत भस्मसात झाली तर एच. यू. गुगळे क्लॉथ स्टोअर्स यांची मोठया प्रमाणात हानी झाली. पाच अग्निशामक दलाच्या बंबांच्या व नागरिकांच्या मदतीने सुमारे सात तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणता आली यामध्ये सहा कोटी रुपयांपेक्षा जास्त हानी झाली आहे.
कर्जत शहरामध्ये मुख्य बाजारपेठेमध्ये पिसाळ आणि शेळके यांच्या मोठी बिल्डिंगमधील शॉपिंग कॉम्लेक्समध्ये अनेक दुकाने थाटली आहेत. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास या इमारतीमध्ये असलेल्या नागेबाबा पतसंस्थेच्या वॉचमनला यशांजली रेडीमेड या मॉलमधून धूर निघत असल्याचे दिसले त्यांना तातडीने ही माहिती संबधितांना दिली. लगेच दुकानाचे मालक विजय धनराज नेटके हे तिथे आले. त्यांनी काही मित्रांना फोन केले. अंबालिका कारखान्याचे व्यवस्थापक शहाजी भगत यांना फोनवरून माहिती दिली असता त्यांना लगेच कारखान्याचा अग्निशामक बंब पाठवून दिला. त्यानंतर करमाळा, श्रीगोंदे, जामखेड व नगर येथूनही बंब आले, काही स्थानिक पाण्याचे टँकर तिथे आले व शेकडो मदतीचे हात तिथे धावले. आग वाढत होती. सलग पाच दुकाने या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सात तास शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.
मात्र या आगीमध्ये यशांजली रेडीमेड या शॉपिंग मॉलचे किमान तीन कोटींचे नुकसान झाले आहे अशी फिर्याद विजय नेटके यांनी दिली आहे याशिवाय वर्धमान सिलेक्शनचे मालक महेंद्र गांधी, एच. यू. गुगळे क्लॉथ स्टोअर्सचे संचालक अभय बोरा, डी. एस. टेलर्सचे नाना धांडे , शारदा मेडिकलचे अमोल गायकवाड व डॉ. गायकवाड यांच्या दवाखान्याच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये नुकसानीची तक्रार करण्यात आली असून त्यांचेदेखील तीन कोटीपेक्षा जास्त नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले.
या दुर्घटनेनंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार राम शिंदे यांनी येथे भेट दिली. या वेळी त्यांनी नुकसान झालेल्या सर्व व्यापा-यांचे सांत्वन केले. या वेळी आमदार राम शिंदे यांनी कर्जत शहरासाठी डीआरडीमधून २५ लाख रुपये अग्निशामक बंबासाठी मंजूर केले होते, मात्र ग्रामपंचायतीकडे हे बंब चालवण्यासाठी कुशल कर्मचारी नसल्याने अडचण आली असे सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Mar 2014 रोजी प्रकाशित
कर्जतमध्ये पाच दुकानांना आग; सहा कोटींची हानी
कर्जत शहरात मध्यरात्री यशांजली रेडीमेड, वर्धमान सिलेक्शन व गुगळे क्लॉथ स्टोअर्स या तीन मोठया कापड दुकानांसह डी एस टेलर्स व शारदा मेडिकल या पाच दुकानांना अचानक आग लागली.

First published on: 12-03-2014 at 02:57 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire to five shops in karjat six crore loss