निवडणुकीत मतदारांना मतदानाच्या स्लिप यंदा प्रथमच प्रशासनातर्फे दिल्या जाणार आहेत. त्यासाठी मतदान केंद्रस्तर अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. अन्य पक्षांकडून अशा पद्धतीची मतदान स्लिप देण्यास निवडणूक आयोगाचा मज्जाव नाही. मात्र, त्यावर पक्षाचे चिन्ह, उमेदवाराचे अथवा पक्षाचे नाव असल्यास तत्काळ त्या पक्ष किंवा उमेदवारावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदविला जाणार आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. दरम्यान, निवडणुकीत पसे देणारा व घेणारा दोघेही गुन्हेगार आहेत. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होईल, असे वर्तन कोणी करू नये. तो कोणत्या पक्षाचा पदाधिकारी वा नेता आहे, याची गय केली जाणार नाही. स्टार प्रचारकांसह अन्य प्रचारक व्यक्तींकडून केल्या जाणाऱ्या खर्चावर करडी नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे निवडणूक निर्भीड व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यास यंत्रणा सज्ज असल्याचे डॉ. नारनवरे यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत प्रथमच मतदाराला नकारार्थी मतदानाचा हक्क मिळणार आहे. मतदान यंत्रावर दिलेल्या उमेदवारांपकी कोणालाच मतदान करायचे नसल्यास नकार दर्शविणारे बटन (नोटा) मतदारांना पर्याय म्हणून दाबता येणार आहे. या सर्व प्रक्रियेचे ऑनलाईन नियमन केले जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी २१ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती असेल. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. सर्वाना निवडणुकीची माहिती व मार्गदर्शन करण्यास हा कक्ष काम करणार आहे. त्यासाठी टोल फ्री नंबरही उपलब्ध केला जाणार असल्याचे डॉ. नारनवरे यांनी सांगितले. मतदान यंत्रात काही बिघाड झाल्यास पर्यायी यंत्राची उपलब्धता आहे. त्यातही बिघाड झाल्यास आयोगाकडून तज्ज्ञ अभियंत्यांमार्फत जिल्ह्यातील १७ अभियंत्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात १७ लाख ७ हजार ६५९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पकी १६ लाख ६५ हजार १०२ मतदारांकडे मतदार ओळखपत्र आहे. हे प्रमाण ९७ टक्के आहे. लातूर जिल्ह्य़ातील औसा व सोलापूर जिल्ह्य़ातील बार्शी, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद व परंडा या ६ विधानसभा मतदारसंघांचा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. एकूण १ हजार ९७१ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार असून, ६ सहायक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. उस्मानाबाद मतदारसंघाचे मतदान १७ एप्रिलला होईल. जिल्हा निवडणूक अधिकारी बी. एस. चाकुरकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड या वेळी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 6th Mar 2014 रोजी प्रकाशित
प्रशासनातर्फे यंदा प्रथमच मतदानाच्या स्लिपचे वाटप
निवडणुकीत मतदारांना मतदानाच्या स्लिप यंदा प्रथमच प्रशासनातर्फे दिल्या जाणार आहेत. त्यासाठी मतदान केंद्रस्तर अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. अन्य पक्षांकडून अशा पद्धतीची मतदान स्लिप देण्यास निवडणूक आयोगाचा मज्जाव नाही.
First published on: 06-03-2014 at 05:03 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First time voter slip distribute osmanabad