मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर बांदा-इन्सुली पोलीस चेक नाक्यावर २५ लाख रुपयांच्या विदेशी चलनाच्या नोटा पोलीस तपासात खाजगी प्रवासी बस ड्रायव्हरकडे सापडल्या. हा ड्रायव्हर नोटांचे बंडल मुंबईत नेऊन देणार होता. त्याचे नाव नूर अलाह सय्यद महंमद हयाद (३६, रा. दावणगिरी कर्नाटक) असे असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी उद्या बांदा येथे येणार आहेत.
मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर गोवा राज्याच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्र पोलिसांचे बांदा-शेर्ले या ठिकाणी चेक नाके आहेत. त्या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी पोलीस मद्यपी ड्रायव्हरची तपासणी करतात. नाक्यावर तपासणीसाठी इशारा देऊनही गाडी थांबली नसल्याने विदेशी चलन नोटांची भानगड उघड झाली.
गोवा ते मुंबई धावणारी जी-ए-०८ यु ९५६० ही ज्वाली नावाची आराम बस थांबविण्याचा इशारा हवालदार संजय कदम यांनी दिला. बस थांबली नाही. ती भरधाव वेगाने निघाली, प्रसंगावधानता पाळत हवालदार संजय कदम यांनी मोटरसायकल वेगाने हाकत इन्सुली येथे बससमोर आडवी लावून गाडी थांबविली.
या वेळी बसची तपासणी केली. त्यानंतर बसच्या दुसऱ्या ड्रायव्हरच्या शर्टाच्या पोटात काहीतरी लपविले आहे याची कल्पना येताच हवालदार कदम यांनी बांदा पोलीस निरीक्षक गजानन मातोंडकर यांना कल्पना दिली. त्यानंतर बांदा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी धावले. त्याची झडती घेतली असता शर्टाच्या आतमध्ये असणाऱ्या पाकिटात चलनी नोटा सापडल्या.
या चलनी नोटांत २० हजार अमेरिकन डॉलर, १४ हजार ७५० ब्रिटिश पाउंड, ४ हजार दिऱ्हाम अरब अमिरातचे अशा भारतीय चलनाप्रमाणे २५ लाख रुपयांच्या विदेशी चलनाच्या नोटा सापडल्या. चालक नूर अलाह सय्यद महंमद हयाद हा कर्नाटकचा असल्याने पोलिसांचा संशय आणखीच बळावला. यासीक भटकळ हाही कर्नाटकमधील आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक गजानन मातोंडकर यांनी पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांना माहिती दिली.
मद्यपी ड्रायव्हरची तपासणी करण्यासाठी हवालदाराने इशारा देऊनही गाडी थांबली नसल्याने हा प्रकार उघड झाला. अमेरिकन, ब्रिटन व संयुक्त अरब अमिरात या देशांच्या नोटा सापडल्याने सारेच चक्रावून गेले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा अधिकार अंमलबजावणी संचालनालय विभागाला असल्याने त्यांना कळविण्यात आले.
या चलनी नोटांचे पॅकेट एका इसमाने गोवा मडगाव येथे आपल्याला देऊन मुंबई व्हीटी या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीला देण्यास सांगितले होते असे अटकेतील चालकाने सांगितले. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. विदेशी चलन हवाला मार्गाचा शोध घेऊन म्होरक्यावर कारवाई केली जाईल.
विदेशी चलनी नोटा कोणत्या कामासाठी नेण्यात येत होत्या? त्या कोठून आल्या? त्या दहशतवादी कारवाईसाठी वापरल्या जाणार होत्या किंवा कसे? असे अनेक प्रश्न पोलिसांना पडले असून, त्याची चौकशी करत आहेत असे सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Sep 2013 रोजी प्रकाशित
बांद्याजवळ २५ लाखांच्या विदेशी नोटा जप्त!
मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर बांदा-इन्सुली पोलीस चेक नाक्यावर २५ लाख रुपयांच्या विदेशी चलनाच्या नोटा पोलीस

First published on: 30-09-2013 at 02:53 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foreign currency worth 25 lakhs seized at banda