अहिल्यानगर : शहराजवळील खारेकर्जुने येथे धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला वन विभागाने पिंजऱ्यात पकडले. मात्र, पकडलेला बिबट्या ‘तो’ नरभक्षक नव्हेच, असा आक्रमक पवित्रा घेत ग्रामस्थांनी वन विभागाला जाब विचारला. त्याच दरम्यान काही वेळातच दुसरा बिबट्या विहिरीत पडलेला आढळल्याने नरभक्षक बिबट्याला ठार मारा अन्यथा आम्ही फाशी घेऊ, अशी आग्रही भूमिका घेत महिलांनी बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यास विरोध केला. अखेर सायंकाळी विहिरीतील बिबट्याला वन विभागाने बाहेर काढले. आज, सोमवारी दिवसभरात दोन बिबटे वन विभागाने पकडले.

तीन दिवसांपूर्वी खारेकर्जूने येथे बिबट्याने पाच वर्षांच्या मुलीवर हल्ला करत तिला ठार मारले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी निंबळक येथे आठ वर्षांच्या मुलाला जखमी केले. परिसरातील पशुधनावरही बिबट्याने हल्ले केले. त्यामुळे पंचक्रोशीत भीतीचे वातावरण होते. बिबट्याला ठार मारण्यासाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनही केले. परिणामी खारेकर्जूने परिसरातील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचा आदेश वन्यजीव विभागाने दिला.

वन विभागाने त्याची तयारी केली असतानाच काल, रविवारी रात्री लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. आज, सोमवारी सकाळी पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या वन विभागाचे पथक घेऊन गेले. मात्र, ग्रामस्थांना त्यांनी काहीच कल्पना दिली नाही. परिणामी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत वन अधिकाऱ्यांना जाब विचारला. दुपारच्या सुमारास खातगाव टाकळी रस्त्यालगत पानसंबळ वस्तीवरील विहिरीत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. वन विभागाने दिशाभूल केल्याचा आरोप ग्रामस्थ करत होते. नरभक्षक बिबट्या पकडला, तर मग विहिरीत पडलेला दुसरा बिबट्या आला कुठून, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यामुळे सुरुवातीला ग्रामस्थांनी बिबट्याला विहिरीतून बाहेर काढू दिले नाही. बिबट्याला ठार मारा अन्यथा आम्ही फाशी घेऊ, अशी आक्रमक मागणी महिला करत होत्या. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके व इतर पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत ग्रामस्थांना शांत केले. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते.

ग्रामस्थांमध्ये संशय

पिंजऱ्यात पकडलेला बिबट्या ग्रामस्थांना न दाखवताच वन विभागाचे पथक घेऊन गेले. त्यामुळे पकडलेला बिबट्या हा नरभक्षक बिबट्याच होता का, याबद्दल ग्रामस्थांच्या मनात शंका आहे. त्याच वेळी दुसराही बिबट्या पकडला गेला. त्यामुळे पुढील काळात अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी वन विभाग आणि प्रशासन जबाबदार राहील असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी दिला.

खातरजमा केली जाईल

खारेकर्जुने येथील मुलीवर हल्ला केलेला बिबट्या ड्रोनमध्ये आढळून आला आहे. तो व पकडलेला बिबट्या याचा ‘पॅटर्न’ शोधून दोन्ही एकच आहे का, याबाबत विश्लेषण केले जाईल. त्यानंतरच मुलीवर हल्ला केलेला बिबट्या आणि पकडलेला बिबट्या एकच आहेत याची खातरजमा होईल. खारेकर्जुने व निंबळक परिसरात एकूण ११ पिंजरे लावलेले आहेत. तसेच दोन ‘रेस्क्यू टीम’ तैनात असल्याचे अहिल्यानगरचे वन परिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) अविनाश तेलोरे यांनी सांगितले.