|| नीरज राऊत
धाग्याला गळ; वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष:-साधारण संक्रांतीला पतंग उडवण्याचा छंद जोपासला जातो, मात्र पालघर जिल्ह्य़ातील काही भागांत मुसळधार पावसात पतंग उडविण्यामागचा उद्देश वटवाघळांची शिकार करण्याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. धाग्याला गळ लावून त्याद्वारे वटवाघूळ पकडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र या साऱ्या प्रकाराकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.
पालघर शहरासह जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात संधिप्रकाशाच्या वेळी काळ्या रंगाचे पतंग आकाशामध्ये उडवले जात असल्याचे दिसून येत असून या पतंगाचा नेहमीच्या मांजा (धागा) ऐवजी मासेमारीत वापरल्या जाणाऱ्या जाळ्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या तंगाचा वापर केला जातो. या तंगाला प्रत्येक दीड ते दोन फुटांवर गळ बांधण्यात येतो. तंगाला २०-२५ गळ असलेला पतंग सुमारे ४० ते ५० मीटर उंचीवर उडवण्यात येतो. सायंकाळी साडेसहा ते साडेसात यादरम्यान घरटय़ातून बाहेर पडणारी वटवाघळं त्यांच्या खाद्यासाठी शेतीच्या भागाकडे प्रवास करीत असतात तसेच अंधार पडण्याच्या सुमारास ही थव्याने फिरणारी वटवाघळं पतंगाच्या धाग्याला बांधलेल्या गळामध्ये अडकून पकडली जातात.
पतंगाच्या मांजाला गळ बांधून केली जाणारी वटवाघळांची शिकार ही जुलै महिन्यापासून नवरात्रीपर्यंत केली जात असून मुसळधार पाऊस आल्यास कागदी पतंग भिजून खाली पडत असल्याने त्याऐवजी सध्या प्लास्टिकचे पतंग वापरण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे पक्षी व प्राण्यांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी वन विभाग वेगवेगळ्या प्रकारे उपाययोजना आखत असताना स्थानिक पातळीवर केली जाणारी वटवाघळांची शिकार रोखण्यास वन विभागाला अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे.
चरबीपासून तेल
वटवाघळांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी झाली असली तरीदेखील पालघर शहरामध्ये दररोज उडवण्यात येणाऱ्या २० ते २५ पतंगांमुळे पाच ते दहा वटवाघळे मारली जात असल्याची माहिती पुढे आली आहे. या वटवाघळांची कातडी काढल्यानंतर त्यावर असलेल्या चरबीचा थर ब्लेडद्वारे कापून त्याचे तेल बनवले जाते. मुका मार व सांध्यांच्या व्याधीवर हे वटवाघळाचे तेल परिणामकारक असल्याचे सांगितले जाते.