Malegaon Blasts Case : मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात अंतिम निकाल लवकरच सुनावला जाण्याची शक्यता आहे. विशेष राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) न्यायालयाने गुरूवारी सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींना ३१ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या दिवशी या प्रकरणात अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी हा खटला मोठा असून यासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

सरकारी वकिलांनी आणि बचाव पक्षाने त्यांचा अंतिम लेखी युक्तिवाद सादर केल्यानंतर १९ एप्रिल रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. दरम्यान विशेष न्याय‍धीशांची मुंबईच्या बाहेर बदली झाल्यानंतर फक्त निकाल जाहीर करण्यासाठी त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

लवकरच या प्रकरणात निकाल जाहीर केला जाणार आहे. दरम्यान या प्रकरणात गंभीर आरोप असलेल्या भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा सिंग ठाकुर यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. “न्यायमूर्ती जशी तारीख देतात तशीच आजही दिली. आज निर्णय होणार असे काही निश्चित नव्हते. पुढील तारखेला निर्णय होईल हे निश्चित आहे. न्यायाधीशांनी सांगितलं की त्याचे (निर्णयाचे) एक लाखाहून जास्त पाने आहेत आणि हे मोठं प्रकरण आहे, यासाठी वेळ लागतो. कोणावरच अन्याय होता कामा नये. त्यानंतर त्यांनी ३१ जुलै ही पुढील तारीख दिली आहे,” अशी माहिती भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दिली.

निकाल काय लागेल याबद्दल बोलताना ठाकूर म्हणाल्या की, “सत्य मेव जयते, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. या प्रकरणाला १७ वर्ष झाली…. ज्या व्यक्तीवर आरोप होतात एकतर त्याला सत्य ठाऊक असते किंवा ईश्वराला. त्यामुळे माझा विश्वास आहे की, सत्य मेव जयते. सत्याचा कायम विजय होतो, धर्माचा कायम विजय होतो आणि यावेळी देखील होईल.”

सरकारी वकिलांकडून मृत्युदंडाच्या शिक्षेची मागणी केली जात असल्याबद्दल विचारले असता ठाकुर म्हणाल्या की, “एटीएसला शक्य असतं तर त्यांनी त्याच दिवशी माझी मान मुरगळून टाकली असती. त्यांचे माझ्याशी इतके शत्रुत्व आहे आणि शत्रुत्व का आहे माहिती नाही. जे विधर्मी लोक आहेत त्यांच्यासाठी तर मी त्यांची शत्रूच आहे. जे देश विरोधी, देशाचे गद्दार आहेत त्यांच्यासाठी मी शत्रूच आहे, कारण ते माझ्यासाठी शत्रू आहेत. त्यांचा मी कायम विरोध करत राहील. देशात देशभक्तच राहिले पाहिजेत, इथे देशाच्या गद्दारांसाठी कोणतेही स्थान नाही.”

नेमकं काय झालं होतं?

२९ सप्टेंबर २००८ साली रमजान महिन्यात मशि‍दीजवळ मोटारसायकलवर ठेवलेल्या दोन बॉम्बचा स्फोट झाला होता. या घटनेला १७ वर्ष उलटून गेल्यानंतर या प्रकरणात निकाल जाहीर केला जाणार आहे. या बॉम्ब स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता तर १०१ जण जखमी झाले होते. सुरुवातीला दहशतवादी पथकाने या प्रकरणाचा तपास केला त्यानंतर हे प्रकरण २०११ साली एनआयएकडे सोपवण्यात आले.

या प्रकरणात सुरुवातीला मुस्लिम तरुणांना अटक करण्यात आळी होती मात्र या प्रकरणात नंतर मोठे खुलासे झाले. एटीएसने या प्रकरणात हिंदूत्ववादी गटाचा सहभाग उघड करणारे पुरावे सादर केले. दरम्यान एनआयएने सांगितले की हा हल्ला जातीय अशांतता भडकवणे आणि सूडबुद्धीने हिंसाचार भडकवणे हा होता.

या प्रकरणात आरोपी असलेल्या भाजपाच्या २०१९ ते २०२४ मध्ये खासदार राहिलेल्या प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्यावर भारतीय दंड सहिंतेच्या कलम ३०२, १२० ब आणि २९५ आणि बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा आणि स्फोटक कायद्याअंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या प्रकरणाची सुनावणी ही ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झाली. ३२३ साक्षीदारांची पडताळणी केल्यानंतर सप्टेंबर २०२३ मध्ये सरकारी वकिलांनी आरोपींविरोधातील सर्व पुरावे सादर केले. क्रिमीनल प्रोसिजर कोडच्या कलम ३१३ अंतर्गत सातही आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले.