गेल्या काही दिवसांपासून नागपुरात पालिका आयुक्त तुकाराम मुंढे विरूद्ध लोकप्रतिनिधी असा वाद पाहायला मिळत आहे. यावर विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त केलं. “लोकशाही प्रक्रियेत लोकप्रतिनिधींना विचारणारच नाही या मानसिकतेतून काम व्हायला नको,” असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं. ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’या एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

आणखी वाचा- उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा पूर्ण होत नाहीत, खूप संभाळून पावले उचलतात – देवेंद्र फडणवीस

“नागपूरमध्ये आयुक्तांविरोधात सर्व पक्ष का उतरले हे पाहावं लागेल. लोकप्रतिनिधींना विचारणार नाही अशा मानसिकतेत काम व्हायला नको. या गोष्टींमध्ये सरकारला पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. हा वाद दुर्देवी आहे,” असं मतही फडणवीस यांनी व्यक्त केलं. “आयुक्त एकीकडे आणि लोकप्रतिनिधी दुसरीकडे असं करून चालणार नाही. राज्य सरकार काय करतंय, जाणूनबुजून करतंय का? या वादात मी पडणार नाही. त्यांनी लोकप्रतिनिधींनाही सोबत घ्यावं हा सल्ला द्यावा असं मी सरकारला सांगेन,” असंही ते एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाले.

आणखी वाचा- अर्थव्यवस्थेला उभं करण्यासाठी आता धाडसी निर्णय घ्यावे लागतील – देवेंद्र फडणवीस

काय आहे प्रकरण?

मध्यतंरीच्या काळात नागपूरच्या महापौरांनीही नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर टीका केली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या निर्णयांबाबत नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे नगरसेवकांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेत असल्याचाही आरोप त्यांच्यावर झाला. तुकाराम मुंढे फोन उचलत नाहीत, भेटायला गेल्यास बाहेर उभं ठेवतात अशाही तक्रारी त्यांच्या संदर्भात झाल्या होत्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर तुकाराम मुंढे यांची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयात पत्र पाठवून केली होती. याबाबत सामनाच्या मुलाखतीत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला होता. त्यावेळ मुख्यमंत्र्यांनी आपण तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी उभे असल्याचं म्हटलं होतं.