सावंतवाडी: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या सावंतवाडी येथील निवासस्थानी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा केली. ते आणि त्यांचे कुटुंबीय दीड दिवस ही पूजा करतात.
आमदार दीपक केसरकर, माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात गणेशाची आराधना केली. आपल्या परंपरेनुसार, त्यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून चालत आलेल्या रुढी आणि परंपरा जपत श्री गणेश पूजा करतात. यावेळी, कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन गणेशाचे स्वागत केले आणि आशीर्वाद घेतले.
गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; घरगुती गणपती ७३ हजार विराजमान !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला आहे. जिल्ह्यातील सर्व लहान-थोर नागरिक गौरी-गणपती सणाच्या जल्लोषात पूर्णपणे मग्न आहेत. या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल ७२,७५५ घरगुती आणि ३२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
श्री गणेश मुर्ती चे आगमन, प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच विद्युत रोषणाईने घरे उजळून निघाली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील भाविक बहुतांश वेळा मातीच्या गणेश मूर्तींची पूजा करतात. अनेक घरांमध्ये दीड, पाच, सात, नऊ, किंवा अकरा दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. वाढत्या महागाईचा परिणाम श्रींच्या पूजेवर अजिबात झालेला नाही, कारण हा सण साजरा करताना प्रत्येक घरात आनंदी आणि उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे.