तुकाराम झाडे, लोकसत्ता

हिंगोली : जिल्ह्यात काँग्रेसअंतर्गत गटबाजी असल्याने पक्षात काम करणे कठीण झाले आहे. आमदार प्रज्ञा सातव याच सर्वेसर्वा असल्यासारख्या वागत असून पक्षाची ध्येयधोरणे पोहोचविण्याचे काम अवघड होऊन बसले आहे. पक्षात कुचंबणा होत असून तोडगा न निघाल्यास पर्यायी मार्गाचा विचार करावा लागेल, असे माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी म्हटले आहे. शिवसेनेतील फाटाफुटीनंतर काँग्रेसमधील नाराज आमदारही सत्तेच्या वाटेवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. भाजप वा शिवसेनेतील पोकळीत टारफे स्वत:चे भविष्य तपासत असल्याची चर्चा अलीकडेच सुरू झाली होती. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्यासह अन्य काही नेत्यांनी टारफे यांची भेट घेऊन पक्षांतराविषयी चर्चा केली होती. पक्षांतराच्या चर्चेबाबत विचारणा करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता,‘ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत, असे असताना जिल्ह्यात पक्षांतर्गत गटबाजी कायम आहे. डॉ. प्रज्ञा सातव ह्याच सर्व निर्णय घेतात. त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. गटबाजीमुळे पक्षात काम करणे माझ्यासारख्याला असह्य झाले आहे.’ असे सांगत पक्षातील नाराजी लक्षात घेऊन भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधला असल्याचे मान्य करत टारफे म्हणाले, की शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेसह अनेकांनी संपर्क केला आहे. सध्या तरी काँग्रेस पक्षातच आहे. परंतु काँग्रेसअंतर्गत गटबाजीवर पक्षश्रेष्ठीने वरिष्ठ पातळीवरून तोडगा न काढल्यास भविष्यात माझ्यासाठी इतर कोणत्याही पक्षाचा मार्ग मोकळा असेल. मराठवाडय़ात काँग्रेसच्या नाराजांना भाजपकडून संपर्क साधला जात आहे. २०१२ पासून टारफे काँग्रेसमध्ये काम करत होते. २०१४ मध्ये ते कळमनुरीचे आमदार होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांचेही ते जवळचे नातेवाईक आहेत.