माजी आमदार, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, कामगार नेते व लेखक जयानंद शिवराम मठकर (८७) यांचे सकाळी अल्पशा आजाराने बेळगाव रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवार, ८ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता उपरल स्मशानभूमीत अन्त्यसंस्कार करण्यात येणार आहे. जयानंद मठकर सन १९७४ व सन १९७८ मध्ये दोन वेळा आमदार म्हणून विजयी झाले होते. त्यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२९ मध्ये झाला होता. सन १९४८ ते १९६० या काळात गोवा स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय सहभाग घेतला होता. आझाद गोमंतक दल व गोवा लिबरेशन आर्मीच्या कार्याला सहभाग होता. महाराष्ट्र राज्य आणि भारत सरकारची स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान्यता आणि निवृत्तिवेतनही मठकर यांना मंजूर झाले होते. सन १९४८ साली सावंतवाडी संस्थान प्रजा परिषदेने विलीनीकरणासाठी केलेल्या संग्रामात ते सहभागी होते. सन १९४८ ते १९७७ या कालावधीत अखंड रत्नागिरी जिल्ह्य़ात समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते नंतर जनता दलाचेही होते. सन १९४९ मध्ये विलीन संस्थानी मुलखात विधानसभा निवडणुका घेण्याचे टाळत आमदारांची नियुक्ती केल्याच्या विरोधात समाजवादी पक्षाने विधानसभेवर सत्याग्रह केला. त्यामुळे एका महिन्याची कारावासाची सजा, सन १९५२ मध्ये धान्य भाववाढ सत्याग्रह केला म्हणून एक महिना कारावास, सन १९६९ मध्ये भूमी बळकाव सत्यागृह केला, दोन आठवडय़ाची कारागृह शिक्षा, सन १९७७ मध्ये जनता पक्षाची स्थापना रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष व सावंतवाडी तालुका अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा केंद्रासाठी सन १९८२ मध्ये एक आठवडा कारागृहवास, जिल्हा न्यायालय वकील संघटना आंदोलनात एक आठवडा कारावास भोगला आहे.
आमदार म्हणून दोन वेळा विधानसभेवर गेल्यावर विविध समित्या, राज्य ग्रंथालय, विडी उद्योग, बांधकाम, पाटबंधारे व कामगारासाठी लढा दिला. पत्रकारितेत विविध वृत्तपत्रात, साप्ताहिकात लिखाण केले. वैनतेय या साप्ताहिकाचे ते संपादकही होते. ग्रंथालय, सहकार, विडी उद्योग, कौल कारखाना अशा निर्मितीत सक्रिय भाग तसेच साहित्य व पत्रकार क्षेत्रात अखंडपणे काम केले. जयानंद मठकर यांची पुस्तके काही प्रकाशित तर काही अप्रकाशित आहेत. माजी खासदार बॅ. नाथ पै, माजी रेल्वेमंत्री कै. मधु दंडवते, नानासाहेब गोरे, मृणाल गोरे, ग. प. प्रधान अशा अनेक मान्यवरांसोबत त्यांनी काम केले. त्यांना राज्यस्तरीय दर्पण, आर्यभूषण, ग्रंथमित्र पुरस्कार प्राप्त झाले. जयानंद मठकर यांनी शेवटपर्यंत पत्रकारिता, ग्रंथालय, कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठविला. त्यांनी ८७ वर्षांच्या काळात अखंड काम केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mla jayananda mathkar passes away
First published on: 08-04-2016 at 01:46 IST