शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांचा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठीचा फॉर्म्युला ठरला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी २१ जून २०२२ ला बंड करत महाविकास आघाडीमधून बाहेर पडत थेट पक्ष नेतृत्वाला आव्हान दिलं. त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपाच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आता तसंच शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे दोन्हीही शिंदेंना निवडणूक आयोगाकडून मिळालं आहे. अशात आता २०२४ चा जागा वाटपाचा भाजपा आणि शिवसेनेचा फॉर्म्युला ठरला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय सांगितला फॉर्म्युला?

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागा आहेत. अशात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा २४० जागा लढवणार तर ४८ जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिल्या जाणार आहेत. २०२४ मध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा एकत्र लढणार आहेत. त्यासाठीचा हा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर जे पहिलं भाषण केलं त्यावेळी पुढच्या निवडणुकीत म्हणजेच २०२४ च्या निवडणुकीत आम्ही आणि भाजपा मिळून २०० जागा जिंकू अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार आले आहेत. शिवसेनेतलं आत्तापर्यंतचं सर्वात मोठं बंड हे एकनाथ शिंदे यांनी केलं. त्यानंतर भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. या शिंदे गटाला ४८ जागा दिल्या जाणार आहेत असं चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केलं आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी २१ जून २०२२ ला बंड केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यांनी बंड करून थेट शिवसेना नेतृत्त्वाला म्हणजेच उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं. सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार गडगडलं. शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले आहेत. शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेत पडलेली ही सर्वात मोठी फूट आहे. शिंदे विरूद्ध ठाकरे शिवसेना कुणाची हा वाद सुप्रीम कोर्टातही गेला आहे. तो निवडणूक आयोगाच्याही दारात होता. तिथे पक्षचिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. तर सुप्रीम कोर्टातली सुनावणी नऊ महिन्यांनी पूर्ण झाली आहे. त्यावरचा निकाल येणं अपेक्षित आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिंदे गटाची शिवसेना यांच्यातल्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. शिंदे गटाला ४८ जागा दिल्या जातील तर भाजपा २४० जागांवर विधानसभा निवडणूक लढवणार आहे असं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं आहे. त्यामुळे आता यावर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून काही प्रतिक्रिया येणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.