अमरावती : आदिवासींना स्वयंपूर्ण करण्यासाठी आयुष्यभर कार्य करणारे मेळघाटातील संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक सुनील देशपांडे यांचे बुधवारी रात्री उशिरा नागपूर येथील एका खासगी रुग्णालयातील करोनावरील उपचारादरम्यान निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते.

विद्यार्थी जीवनापासून त्यांना समाजकार्याची आवड होती.  मेळघाटात लवादा येथे संपूर्ण बांबू केंद्र या संस्थेची स्थापना करून त्यांनी स्थानिक आदिवासींना बांबू कारागिरी शिकवणे सुरू केले. या माध्यमातून तिथल्या लोकांना रोजगार मिळू लागला. अखिल भारतीय कारागीर पंचायतचे ते राष्ट्रीय संघटक होते.

‘कारागीर पंचायत’ या संस्थेमार्फत ‘हुनर खोज यात्रे’च्या माध्यमातून त्यांनी देशभरातील हरहुन्नरी लोकांचा संग्रह करून अनेक ठिकाणी त्यांच्या वस्तूंचे प्रदर्शन भरवले. मेळघाटातील बांबूच्या वस्तूंना देशभरात ओळख मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न के ले. ‘सृष्टीबंध’ या नावाने गावागावांत बांबूच्या राख्या आणि कलावस्तूंना त्यांनी देशभरात बाजार उपलब्ध करून देत आदिवासींना स्वयंपूर्ण करण्याचे ध्येय बाळगले. २०१८ मध्ये मेळघाटातील कारागीर भगिनींनी ही राखी दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही बांधली होती. हरिसाल नजीकच्या कोठा येथे त्यांनी कर्मकौशल्य शिकवण्याचे गुरुकुल उभारले आहे.