संत गजानन महाराजांच्या प्रकटदिनासाठी शेगावला पायी जाणाऱ्या दिंडीतील अॅपे वाहनाला भरधाव ट्रकने मागून धडक दिली. या अपघातात ४ वारकऱ्यांचा मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी ४.३० च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर येते आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर-बाळापूर मार्गावर असलेल्या बाघ फाट्याजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर सरकीने भरलेले पोते अंगावर पडल्याने त्याखाली दबून वारकऱ्यांचा मृत्यू झाला.
वाशिम जिल्ह्यातील उमरा कापसे या गावातील भाविकांची पायी दिंडी संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव या ठिकाणी निघाली होती. या दिंडीसोबत एक मालवाहू अॅपे होता. ही दिंडी अकोल्यात दाखल होऊन पातूर-बाळापूर मार्गे शेगावकडे जात होती. या मार्गात अॅपेआणि वारकरी झाडाखाली थांबले होते. यावेळी मागून आलेल्या भरधाव ट्रकने अॅपेला धडक दिली. त्यामुळे अॅपे उलटला आणि त्यात बसलेले वारकरी रस्त्यावर पडले. अपघातानंतर नियंत्रण सुटलेला ट्रक रस्त्यावरच उलटला आणि त्यातील सरकीचे पोते वारकऱ्यांच्या अंगावर पडले. या पोत्यांखाली दबल्यामुळे सहा वारकऱ्यांचा मृत्यू झाला.
रमेश धनाजी कापसे, काशीनाथ चंद्रभान कापसे, लिला कापसे आणि रामाजी काकडे या चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर शारदाबाई कापसे आणि आणखी एका महिला गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. हे सगळे जण वाशिमच्या उमरा कापसे येथील रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, ठाणेदार विनोद ठाकरे, महामार्गाचे संजय भोयर यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी भेट दिली. अपघातग्रस्तांसाठी तातडीचे मदतकार्यही राबवण्यात आले. या घटनेमुळे पायी जाणाऱ्या दिंडीवर आणि पश्चिम वऱ्हाडावर शोककळा पसरली आहे.