मालमोटारीची व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील एकाच कुटुंबातील चारजण जागीच ठार झाले. मृतांमध्ये पाचवर्षीय मुलाचा समावेश आहे. नळदुर्ग-तुळजापूर रस्त्यावरील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गपासून जवळच चिवरी पाटीजवळ बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
लोहारा तालुक्यातील मोघा येथील संभाजी दामोदर गरगडे (वय ३५) हे आपली आई गंगुबाई दामोदर गरगडे (वय ६५), मुलगा सोन्या (वय ५) व चुलतभाऊ बळवंत दशरथ गरगडे (वय ३०) यांच्यासह मोटारसायकलवरून (एमएच १४ डीव्ही ९०१७) चिवरी येथे नातेवाईकांच्या विवाहासाठी निघाले होते. मोघा गावावरून तुळजापूरमाग्रे चिवरीला जाताना चिवडी पाटीजवळ मोटारसायकल आली असताना नळदुर्गहून तुळजापूरकडे जाणाऱ्या मालमोटारीने (एमएच २५ बी ७९३७) मोटारसायकलला समोरून धडक दिली. या भीषण अपघातात मोटारसायकलवरील चौघांचा जागीच मृत्यू झाला. नातेवाईकाच्या विवाहासाठी निघालेल्या गरगडे कुटुंबावर रस्त्यातच काळाने घाला घातला.
अपघाताचे वृत्त कळताच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक फुलचंद मेंगडे सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले. पोलिसांनी चारही मृतदेह जळकोट प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. दरम्यान, भीषण अपघातात गरगडे कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याचे समजताच विवाह समारंभात शोककळा पसरली. विवाहासाठी आलेले लोक मोठय़ा संख्येने अपघातस्थळी आले व त्यांनी मालमोटार पेटवून देण्याचा प्रयत्न सुरू केला. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मोहन विधाते, सहायक पोलीस निरीक्षक मेंगडे यांनी अपघातस्थळी जाऊन जमावाला शांत केले. दरम्यान, अपघातप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात मालमोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
संग्रहित लेख, दिनांक 28th May 2015 रोजी प्रकाशित
विवाह समारंभास निघालेल्या कुटुंबातील चौघे जागीच ठार
मालमोटारीची व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील एकाच कुटुंबातील चारजण जागीच ठार झाले. मृतांमध्ये पाचवर्षीय मुलाचा समावेश आहे.
First published on: 28-05-2015 at 01:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four died in road accident