धुळे जिल्ह्यात बुधवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार ठार तर एक जण जखमी झाला. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. नागपूर-सुरत महामार्गावर चित्तोड शिवारात बुधवारी दुपारी महिंद्रा मॅक्स जीप आणि मालमोटार यांच्यात समोरासमोर धडक झाली. त्यात पिंटू भटू मारनर (३०), प्रकाश हिरामण लकडे (३०, दोघेही रा. हेरगाव फाटा, साक्री) आणि विजय भिला पवार (२५, म्हसाळे, साक्री) हे जागीच ठार झाले. धुळे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील काम आटोपून हे तिघे जीपमधून साक्रीकडे निघाले होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा अपघात धुळे-चाळीसगाव रस्त्यावरील गरताड बारी शिवारात झाला. मोटारसायकलवरून निघालेल्या दांपत्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात पोलीस हवालदार राजेंद्र महाजन हे ठार झाले तर त्यांची पत्नी विजयाबाई हा जखमी झाल्या. राजेंद्र महाजन हे अमळनेर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.