वाई : शेतातील कामे करून घरी परत जात असताना ट्रॅक्टर ट्रॉली अरुंद पुलावरून कॅनॉलमध्ये पडून चार महिलांचा मृत्यू झाला, तर चार गंभीर जखमी झाल्या. त्याच्यामध्ये दोन महिलांची प्रकृती गंभीर आहे. सातारा शहरालगत कारंडवाडी येथे ही घटना घडली.

शेतातील कामे करून जनावरांचा चारा घेऊन घरी ट्रॅक्टर ट्रॉलीतून आठ महिला जात होत्या. पावसामुळे या परिसरात रस्त्यावर चिखल झाला होता. कॅनॉलवरील अरुंद पुलावरून जात असताना घसरट्यामुळे ट्रॉली पलटी झाली. ट्रॉलीतील आठ महिला कॅनॉलमध्ये पडल्या. त्यात आठ महिला जखमी झाल्या. ही माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी ताबडतोब सर्वांना सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यातील उल्का भारत माने (वय ५५) अरुणा शंकर साळुंखे (५८) सीताबाई निवृत्ती साळुंखे (६५) लिलाबाई शिवाजी साळुंखे (६०) सर्व रहाणार कारंडवाडी ता. सातारा या जागीच ठार झाल्या. चारजणी जखमी झाल्या. यातील दोघींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा – मुंबई, पुण्यात मोसमी पाऊस सुरू, एकाच दिवसांत व्यापला देशाचा मोठा भाग

या अपघातात ट्रॅक्टर चालकही जखमी झाला असून त्याच्यावरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद सातारा पोलीस ठाण्यात झाली असून, अधिक तपास सुरू आहे.