|| निखील मेस्त्री

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भात खरेदीसाठी व्यापाऱ्यांचा सुळसुळाट; खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी

पालघर : पालघरमध्ये भात खरेदीसाठी  व्यापारी व दलालांचा सुळसुळाट झाला असून रोख रकमेची आमिषे देऊन कमी दरामध्ये भातविक्री करण्यास शेतकऱ्यांना  बळी पाडले जात आहे.  तीन दिवसांपूर्वी पालघर तालुक्यातील नावझे या गावातील शेतकऱ्यांनी अशाच काही व्यापाऱ्यांना पिटाळून लावल्याचा प्रकार घडला होता.

गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी विकास महामंडळातर्फे जिल्ह्यात आधारभूत हमीभाव भात खरेदी केंद्रांवर  शेतकरी आपले भात विक्री करीत आहेत. मात्र यंदा खराब हवामानामुळे हंगाम पुढे गेल्याने वेळेत केंद्र सुरू झालेली नाहीत.   शेतकरी जागृत नसल्याने त्याचा फायदा घेऊन कमी दराने  व्यापारी व दलाल एक हाती भात शेतकऱ्यांकडून खरेदी करून ते खुल्या बाजारात जादा दराने विक्री करीत आहेत.

भात खरेदी केंद्रांवर शेतकऱ्याच्या भाताला प्रतिक्विंटल एक हजार ८६८ रुपये  तर चांगल्या प्रतीच्या भातासाठी ठरलेला हमीभाव व त्यावर केंद्र व राज्य शासनाचा ७०० रुपयांचा बोनस असे एकूण दोन हजार ५६८ रुपये प्रतिक्विंटल भातापोटी शेतकऱ्यांना मिळतो . मात्र पालघर तालुक्यात बहुतांश भात खरेदी केंद्र सुरू नसल्याचा फायदा घेत गुजरात, नालासोपारा, मुंबई येथील  व्यापारी व दलाल शेतकऱ्यांच्या गावांमध्ये जाऊन वैयक्तिकरित्या आमिषे दाखवून प्रति क्विंटल सुमारे तेराशे रुपये इतकाच भाव देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. असाच एक प्रकार गेल्या तीन दिवसांपूर्वी नावझे या गावात  समोर आला होता. मात्र शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केल्यानंतर या व्यापाऱ्यांना गावातून काढता पाय घ्यावा लागला.

भात खरेदी केंद्र ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत सुरू असते. मात्र यंदा खराब हवामानाचा व अवेळी पडलेल्या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे झोडणीचा हंगाम महिनाभर पुढे ढकलला आहे.  सद्यस्थितीत भात खरेदी केंद्र सुरू झालेली नाही. पालघर तालुक्यात सद्यस्थितीत एकाच ठिकाणी भात खरेदी केंद्र सुरू आहे. त्यामुळे याठिकाणी भात विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

भात खरेदी केंद्र एप्रिलपर्यंत सुरू ठेवावी अशीही मागणी समोर येत आहे. ज्या शेतकऱ्यांची झोडणी पूर्ण झालेली आहे. अशा शेतकऱ्यांना एकाच भात खरेदी केंद्रांवर भात विक्रीसाठी जाणे जिकिरीचे ठरत आहे. आंबेदे, काटाळे, चहाडे, नावझे या ठिकाणी भात खरेदी केंद्रे  तातडीने सुरू करावीत व बारदण (गोणी) मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात यावे, अशी मागणी कुणबी सेनेचे अविनाश पाटील व शेतकरी वर्गाने आदिवासी विकास महामंडळाचे संचालक व आमदार सुनील भुसारा यांच्याकडे यापूर्वी केली आहे. दरम्यान, याबाबत आदिवासी महामंडळाचे संचालकांशी  संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

केंद्रावरील हमीभाव दिलासादायक

मजुरी, ट्रॅक्टर आदीचा खर्चासह शेतकऱ्यांना भात उत्पन्नासाठी एका एकराला सुमारे आठ हजार रुपये खर्च येतो. त्यात १५ क्विंटल भाताचे उत्पन्न होते.  एका क्विंटलला सुमारे हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे आधारभूत खरेदी केंद्रांवर मिळणारा हमीभाव हा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. याउलट खाजगी व्यापारीमार्फत दिला जाणारा दर अत्यल्प आहे.

शेतकरी जागृत नसल्याने त्याचा फायदा उचलत हे  व्यापारी-दलाल कमी दराने भात खरेदी करून शेतकऱ्यांची लुबाडणूक करत आहेत. संबंधित विभागाने याची दखल घ्यावी. -रमाकांत सोगले, शेतकरी, नावझे

 

पालघर तालुक्यामध्ये केवळ वरई या एकच ठिकाणी भातखरेदी केंद्र सुरु केल्याने शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. मागिल वर्षी भात खरेदी केंद्रे बंद असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव भात खासगी व्यापारांना विकणे भाग पडत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. -संतोष पावडे, शेतकरी संघर्ष समिती

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud of farmers in the name of cash akp
First published on: 04-12-2020 at 00:09 IST