रत्नागिरी :  फ्रान्सहून आलेला तज्ज्ञांचा चमू येत्या गुरुवारी (२६ मे) जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पस्थळी भेट देणार आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासोबत सहयोगी म्हणून काम करणाऱ्या कंपनीचे हे प्रतिनिधी असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली आहे.    हा चमू उद्या (२५ मे) रत्नागिरीत दाखल होणार असून दुसऱ्या दिवशी, २६ मे रोजी प्रकल्पस्थळाला भेट देणार आहे. अणुऊर्जा महामंडळाच्या कार्यालयाकडून याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविण्यात आली आहे.   स्थानिक ग्रामस्थ आणि शिवसेनेच्या विरोधामुळे वादात अडकलेल्या या मोठय़ा प्रकल्पात सहा न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर बसवण्यास केंद्र सरकारने तत्त्वत: मंजुरी दिल्याची माहिती काही महिन्यांपूर्वी राज्यसभेत देण्यात आली होती. रखडलेला हा अणुऊर्जा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे. फ्रान्सच्या तांत्रिक सहकार्यातून १६५० मेगावॅट क्षमतेचे सहा न्यूक्लीअर रिअ‍ॅक्टर लावण्यास तत्त्वत: मंजुरी देण्यात आल्याने ९ हजार ९०० मेगावॅट क्षमतेचा हा देशातला सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प ठरणार आहे. या ठिकाणी प्रकल्पासाठी आवश्यक जमीन यापूर्वीच अधिग्रहित केली गेली असून संरक्षक भिंतही उभारली  आहे. गुरुवारी होत असलेल्या फ्रेंच तज्ज्ञांच्या भेटीमुळे या प्रकल्पाला आणखी चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: French experts nuclear power plant france experts project site source text ysh
First published on: 25-05-2022 at 00:02 IST