फळांचा बाजारभाव घसरल्याने डहाणू तालुक्यातील शेतकरी हवालदिल
नीरज राऊत, पालघर
गेल्या दोन आठवडय़ापासून सलग पडणाऱ्या पावसामुळे व हवेतील आर्दतेमुळे चिकू फळबागांवर बुरशीचा प्रादुर्भाव झाला असून यामुळे चिकू बागायतींचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. चिकू फळ पावसाच्या पाण्यात भिजून झाडावरून निखळून पडत असून नव्याने येणाऱ्या लहान फळाला बुरशीजन्य रोगाची लागण झाली आहे. यामुळे पुढील हंगामामध्ये देखील या फळपिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. याचबरोबरीने सध्या चिकू फळांचा बाजारभाव घसरला असल्याने डहाणू तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जिल्ह्यात तीन हजार शेतकऱ्यांकडून सुमारे ५५०० हेक्टर क्षेत्रावर चिकूची लागवड करण्यात आली असून प्रति हेक्टर २००— २५० झाडे आहेत. चिकूच्या प्रायटेक झाडामधून तीन हंगामामध्ये सुमारे १००—१२५ किलो फळाचे उत्पन्न मिळत असते. गेल्या १५ दिवसांपासून सतत पडणारम्य़ा पावसामुळे व सोबत असलेल्या वाऱ्याच्या प्रवाहामुळे डहाणू तालुक्यातील कैनाड, सरावली, आगवन, जामशेत व बोर्डी आदी भागांमधील सुमारे ३००० हेक्टर क्षेत्रावर फायटोप्थेरा (phytophthora infestants ) नामक बुरशीजन्य रोगाने चिकू झाडांवर प्रादुर्भाव झाला असून यामुळे झाडावरील अनेक लहान— मोठी फळे काळी होऊन खाली पडत आहे. त्याचबरोबरीने सलग पडणाऱ्या पावसामुळे व जोराच्या वाऱ्यामुळे हाती आलेल्या फळांची नासाडी होत असून चिकूच्या बागांमध्ये जमिनीवर फळांचा सडा पडल्याचे दिसून येत आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी दोन नंबर चिकूचे दर सुमारे १७०-२७० रुपये प्रति दहा किलो असे होते, मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर चिकूच्या दरांमध्ये मोठय़ा प्रमाणात घसरण होऊन या दर्जाची चिकूला सध्या ४५ ते १५० रुपये प्रति दहा किलो इतकाच दर मिळत आहे. याचबरोबरीने सर्वात लहान समजल्या जाणाऱ्या तीन क्रमांकाच्या चिकूला अवघे दहा ते वीस रुपये प्रति दहा किलो असा दर मिळत असल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. सलग पडणाऱ्या पावसामुळे झाडावर असलेल्या चिकू फळांनी पाणी शोषून घेत असल्याने या फळाची सडण्याची प्रक्रिया झाडावर सुरू होते. तसेच जोरदार वाऱ्यांमुळे १०-१५ किलो फळं झाडावरून निखळून खाली पडली असून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा शेतकरऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. यामुळे दिवाळीमध्ये बाज येणाऱ्या फळ पिकावर परिणाम होणार असून त्यामुळे डहाणू भागातील शेतकरऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून चिकू पिकाला पंतप्रधान पिक विम्याचा लाभ दिला जात असून यावर्षी देखील जिल्हयातील तीन हजार शेतकरऱ्यांनी या पिक विमा योजना आपली नोंदणी केली आहे. मात्र यावर्षी चिकू विम्याच्या पात्रतेसाठी सलग चार दिवस किंवा दहा दिवस ९० टक्के पेक्षा अधिक हवेतील आद्र्रते सोबत २० मिलिमीटर पावसाची अट टाकण्यात आली आहे. या अटीबद्दल शेतकरऱ्यांनी आक्षेप नोंदवला असून फायटोप्थेरा या बुरशीच्या वाढीसाठी ९० टक् क्यांहून अधिक आद्रता पुरेशी असून पाऊस पडत नसला तरीही या बुरशीजन्य रोगाचा प्रसार होतो व झाडावर प्रादुर्भाव होतो असे तज्ज्ञांनी मान्य केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. चिकूचा विम्यासाठीची अट जाचक असून शासनाने याचा पूर्ण याआधीचा पुनर्विचार करावा, असे शेतकऱ्यांची मागणी आहे. गेल्या वर्षी येथील शेतकऱ्यांना २४ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली असून या वर्षी जिल्ह्यातील तीन हजार शेतकऱ्यांनी चिकू पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे, असे तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी सांगितले.
चिकू पीक विमा मिळण्यास प्रमाणके
१ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत सापेक्ष आद्रता सलग पाच दिवस ९० टक्केपेक्षा जास्त आद्र्रता राहिल्यास व प्रतिदिन २० मिली मीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस सलग चार दिवस झाल्यास २५ हजार रुपये प्रति हेक्टर तसेच पिक विमाच्या कालावधीत सापेक्ष आद्र्रता सलग दहा दिवस ९० टक्क्यांहून अधिक राहिल्यास व प्रतिदिन २० मिली मीटर किंवा त्यापेक्षा जास्ती पाऊस सलग आठ दिवस झाल्यास ५५ हजार रुपये प्रति हेक्टर व तसेच कमाल नुकसान भरपाई ५५ हजार रुपये प्रति एकर असे ठरवण्यात आली आहे. याकरिता शेतकऱ्यांनी विमा हप्ता संरक्षित रक्कम दोन हजार ७५० रुपये प्रति हेक्टर असे भरणे अपेक्षित होते.