मोदींच्या बाजूने आता कोण उभं राहील?; गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर संजय राऊत यांचा सवाल

ट्रम्पसाठी चीनला दुखवून काय साध्य केले?

गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात २० भारतीय जवानांना वीरमरण आलं. त्यामुळे चीन-भारत संबंध ताणले गेले आहेत. या विषयावरून राजकारण प्रचंड तापलं असून, दररोज नवंनवे प्रश्न सरकारला विचारले जात आहेत. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. परराष्ट्र व संरक्षणविषयक चुकलेल्या धोरणाचे हे फलित असून, चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनात लिहिलेल्या लेखातून गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर भाष्य केलं आहे. मोदी सरकारच्या धोरणांचं विश्लेषण करण्याबरोबरच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत वाढलेल्या जवळकीवर टीका केली आहे. “चीनने आपले २० सैनिक मारले. त्याचा बदला मोदी सरकार कसा घेणार, हाच खरा सवाल आहे. की बदला घेण्यासाठी, सर्जिकल स्ट्राइक करून विजयी डंका पिटण्यासाठी पाकिस्तान हा राखीव ठेवला आहे? २० जवानांच्या हत्येचा बदला मोदी सरकारने घेतला नाही तर ती आपली सगळ्यात मोठी मानहानी ठरेल. १९६२चे चीनबरोबरचे युद्ध नेहरूंच्या धोरणांमुळे हरलो हा डंका भाजपला आता पिटता येणार नाही. गलवान व्हॅलीत चीनचे सैन्य घुसले व आज गलवान व्हॅली चिनी सैनिकांच्या कब्जात आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने बुधवारी दुपारी अधिकृतपणे जाहीर केले की, ‘गलवान व्हॅली हा चीनचाच भूभाग आहे.’ यावर हिंदुस्थानकडून कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही. मोदी सरकारने तटस्थतेचे धोरण सोडून अमेरिकेच्या जास्त कच्छपी लागण्याचे धोरण स्वीकारले व सीमेवरचा चीन जास्त आक्रमक झाला हे येथे लक्षात घेतले पाहिजे. हिंदुस्थानच्या सीमेवरील बहुतेक सर्व राष्ट्रे आज चीनची मांडलिक आहेत. पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका ही राष्ट्रे चीनच्या मदतीवर जिवंत आहेत व चीनच्या इशाऱयावर हिंदुस्थानला आव्हान देत आहेत. महासत्ता अमेरिकेशी मैत्री वगैरे ठीक, पण सीमा अशांत राहिल्या तर महासत्ता काय करणार? अमेरिकेसाठी निकटचा शेजारी असलेल्या चीनशी भांडण करणे ही परराष्ट्र व संरक्षणविषयक नीती असू शकत नाही. दुर्दैवाने आज तेच घडताना दिसत आहे”, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

“आम्हाला आमच्या सीमारेषाच माहीत नाहीत व त्या सीमांच्या रक्षणासाठी देश बलिदान देत आहे. गलवान व्हॅलीत चिनी सैन्य आले. आपल्या सैन्याने प्रतिकार केला. चीन म्हणते, हा सर्व भाग आमचाच. उलट तुम्हीच घुसखोरी केली. यावर आम्ही तसे चूप बसलो आहोत. हवा निघाली पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अमेरिकेचे प्रे. ट्रम्प यांच्याही बाहुबली राजकारणाची हवा लडाख, गलवान व्हॅली प्रकरणात निघाली आहे”, असं राऊत यांनी लेखात म्हटलं आहे.

ट्रम्पसाठी चीनला दुखवून काय साध्य केले?

“वीस सैनिक चीनबरोबरच्या झटापटीत हुतात्मा झाले. अनेक सैनिक बेपत्ता आहेत. ते याच झटापटीत खोल गलवान व्हॅलीत कोसळून मरण पावल्याची भीती आहे. आपला एकही सैनिक चीनचा बंदी नाही असे आधी सांगण्यात आले. प्रत्यक्षात आपले १० सैनिक चीनचे बंदी झाले. त्यांना नंतर चीनने सोडून दिले. हे चीनचे आक्रमण आहे व सरकार त्या आक्रमणाचा प्रतिकार करू शकले नाही. सरकारने या प्रकरणातल्या अनेक गोष्टी लपवून ठेवल्या, त्या आता उघड होत आहेत. पाकिस्तानचे सैन्य कारगिलपर्यंत पोहोचले हे समजताच पंतप्रधान वाजपेयींनी युद्धच पुकारले. लडाख, गलवान व्हॅली चीनच्या जबड्यात गेली व आपण सुटकेचा मार्ग शोधत आहोत. आता ट्रम्पही निवडणूक हरतील अशी स्थिती आहे. ट्रम्पसाठी चीनला दुखवून काय साध्य केले? गडबड, गोंधळ सीमेवर नसून दिल्लीतच आहे, असे फार पूर्वी मोदी म्हणाले होते, ते आता पटले! चीनशी आपले भांडण न संपणारे आहे; कारण या भांडणाचा सरळ संबंध आपण अमेरिकेशी ठेवलेल्या संबंधांशी आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Galwan valley shivsena leader sanjay raut criticised pm narendra modi bmh

ताज्या बातम्या