पालघरमधील सफाळे भागात टोळीकरवी अनेक पक्ष्यांची शिकार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : टॅक्सीडर्मी अर्थात भुसा भरलेले पक्षी मिळवण्यासाठी  सफाळे किनारपट्टीवरील गावांमध्ये तसेच पाणथळीच्या ठिकाणी पक्ष्यांवर विषप्रयोग करणारी टोळी सक्रिय झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या टोळीने माकुणसार, विळंगी परिसरात अनेक पक्षी मारून त्यांची कातडी नेल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात पक्षीमित्रांनी तक्रारी केल्यानंतरही वन विभागाला या टोळीचा शोध घेण्यात अपयश आले आहे.

सफाळे भागामध्ये काही नागरिकांनी पक्ष्यांना विषप्रयोग करून मारण्यासाठी वेगळी युक्ती अवलंबली आहे. विषप्रयोग झालेला पक्षी पाणथळ ठिकाणी किंवा पाण्याच्या स्रोताच्या जवळ मृत्यू पावल्यानंतर त्यामधील जठर व इतर अवयव काढून टाकून पक्ष्याचे बाहेरील आवरण अलगदपणे विक्रीसाठी नेण्यात येते. अशा पक्ष्यांना भुसा भरून टॅक्सीडर्मी किंवा ट्रॉफी म्हणून वापरण्यात येत असल्याची माहिती पक्षीमित्रांकडून उपलब्ध झाली आहे.

मृत पावलेल्या पक्ष्यांमध्ये घार, पान बगळा, रात बगळा, पांढऱ्या मानेचा करकोचा.

लहान पाणकावळा, छोटा बगळा, गाय बगळा, चमच्या, परदेशी बदक आणि इतर काही पक्ष्यांची शिकार झाल्याचे निदर्शनास काही निसर्गप्रेमी व निसर्ग छायाचित्रणाचा छंद जोपासणाऱ्या मंडळींच्या लक्षात आले. मृतावस्थेमध्ये तडफडणाऱ्या पक्ष्यांच्या चोचीमधून फेस येत असल्याचे सांगण्यात आले. ही बाब त्यांनी संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आठवडाभरापूर्वी निदर्शनास आणून देण्यात आली, मात्र या प्रकरणी विषबाधा करणाऱ्या टोळीतील एकाही व्यक्तीला पकडण्यास वन विभागाला अपयश आले नाही.

यासंदर्भात सफाळे वन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता माकुणसार येथे विषप्रयोगाद्वारे पक्षी मारण्याची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी- कर्मचारी यांनी त्या भागात गस्त ठेवली असता कोणीही आढळले नसल्याचे सांगितले. सफाळा विळंगी भागातदेखील वन विभागाचा मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. या भागात कुणालाही संशयास्पदरीत्या मृत पावलेले पक्षी आढळल्यास त्याची माहिती वन विभागाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा पक्ष्यांचे छवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण सांगता येईल असे वन अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. टोळीचा शोध घेण्यासाठी गस्त वाढवण्यात आल्याचेही ते म्हणाले.

विषप्रयोग कसा होतो?

मृत मासे किंवा मृत बंदुकांमध्ये कीटकनाशके, उवा मारण्याचे औषध किंवा सहज उपलब्ध होणारे विष भरले जाऊन असे मासे- बेडूक पाणथळ ठिकाणी टाकण्यात येतात. पक्षी  ते सेवन करतात. काही तासांत ते मृत होऊन पडतात. अशा पक्ष्यांवर देखरेख ठेवणारी टोळी कार्यरत असते. मृत पक्ष्यांमधील जठर व इतर अवयव काढून पक्ष्यांचे आवरण टॅक्सीडर्मी किंवा शोभिवंत पक्ष्यांच्या ट्रॉफी तयार करण्यासाठी दलालांकडे सुपूर्द करण्यात येते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gang active poisoning on birds in saphale zws
First published on: 07-04-2021 at 00:04 IST