सिगारेट दिली नसल्याच्या कारणावरून राष्ट्रीय महामार्गावर काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांच्या टोळीने मिरज-पंढरपूर महामार्गावर गुंडागर्दी करीत एक मोटार पेटवून देत अन्य तीन दुचाकींचे दगड मारून नुकसान करण्याचा प्रकार रात्री घडला. या प्रकरणी मोटारीतून पळून जाण्याच्या प्रयत्नात दोन कामगार पोलिसांच्या हाती सापडले असून त्यांना अटक करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, मिरज-पंढरपूर महामार्गावर सिध्देवाडी खण येथे विजयसिंह नानगुरे यांचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री या दुकानामध्ये महामार्गाचे काम करीत असलेल्या दिलीप बिडकॉन या ठेकेदार कंपनीचे दोन कामगार सिगारेट मागण्यास आले. टाळेबंदीमुळे सिगारेट विक्री बंद असल्याने आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे दुकानदाराने सांगितले. त्यावेळी हे दोघेही मद्याच्या नशेत होते. काही वेळानंतर आणखी काहीजणांना घेऊन येऊन दुकानदाराला शिवीगाळ करीत दंगा करीत होते.

सिगारेट मागणाऱ्या व्यक्तीने दुकानदाराला रागातून मारहाण केली. तसेच दुकान, त्या ठिकाणी उभी असणारी मोटार पेटवली आणि ३ दुचाकींचे दगड मारून त्यांचे नुकसान केले. या घटनेनंतर मिरज ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या वेळी बलोरो मोटारीचे दिवे विझवून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या कन्हैया जवाहरलाल सिंग (वय २९) आणि रूपेंद्र रवांद्रसिंह तोमर (वय २८) या दोघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले, तर अन्य संशयित पळून गेले. या प्रकरणी मिरज ग्रामीण  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.