“बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी उद्धव ठाकरेंचा मान सन्मान करणारच. उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. त्यांच्यावर जर कुठलं संकट उद्या आलं तर मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. नरेंद्र मोदींच्या या वक्तव्याचे आता राजकीय पटलावरून पडसाद उमटत आहेत. काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांंनी यावरून नरेंद्र मोदींवर खरपूस टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले होते?
“उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. ते जेव्हा आजारी होते तेव्हा मी त्यांना फोन केला होता. रश्मी वहिनींना रोज फोन करुन मी उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस करायचो. तसंच ऑपरेशन करण्यापूर्वी त्यांनी मला फोन केला होता. आपका क्या विचार है? असं मला विचारलं होतं. मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही ऑपरेशन करा, बाकीची चिंता सोडा. शरीराकडे लक्ष द्या. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच. उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. त्यांच्यावर जर कुठलं संकट उद्या आलं तर मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन. मात्र बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
हेही वाचा >> पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य चर्चेत, “उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत, उद्या…”
नाना पटोलेंची टीका काय?
“मोदी किती खोटारडे आहेत हे लपलेलं नाही. ते केव्हा रडतील, केव्हा हसतील, नोटबंदी केली आणि जपानमध्ये जाऊन टाळ्या वाजवत बसले होते. देश इथं बरबाद झाला होता आणि लोकांना स्वतःचेच पैसे काढायला रांगेत उभं राहावं लागलं होतं. या रांगेत अनेकांचा मृत्यू झाला होता. आणि मोदी तिथे जाऊन हसत होते. या जगात त्यांच्यासारखा कोणी नटसम्राट नाही”, असं नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा >> “४०० जागा जिंकल्यास भाजपा संविधान बदलेल”, विरोधकांच्या आरोपांवर पंतप्रधान मोदी म्हणाले…
उद्धव ठाकरे औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्यांबरोबर जाऊन बसले
“महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्यांबरोबर सत्तेसाठी जाऊन बसले हे लोकांना मुळीच पटलेलं नाही. भावनिकदृष्ट्या लोक भाजपाबरोबर आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी इतक्या मेहनतीने पक्ष उभा केला. एक विचार महाराष्ट्राला दिला. तो सोडून उद्धव ठाकरे फक्त सत्तेसाठी काँग्रेससह गेले? हे जनतेला पटलेलं नाही”, असं मोदी यांनी म्हटलं आहे.