उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत, असे विधान नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी एका मुलाखतीदरम्यान केले. या विधानानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा भाजपा-ठाकरे एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू झाली असताना शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी मात्र ही चर्चा पूर्णपणे फेटाळून लावली. सांगली येथे चंद्रहार पाटील यांचा प्रचार करण्यासाठी आले असताना संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. “नरेंद्र मोदी खोटं बोलत आहेत. नरेंद्र मोदी अडचणीतले व्यापारी आहेत. अडचणीत आलेला व्यापारी आपल्या फायद्यासाठी खोटं बोलतो, असे चाणक्याने सांगितले आहे”, अशा शब्दात संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रेमाचा पान्हा एवढा फुटला असता तर त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना अशाप्रकारे तोडली नसती. त्यांनी शिवसेना नुसती तोडली नाही तर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नाव आणि चिन्ह एका बेईमान माणसाला देण्याचं कृत्य केलं नसतं. त्यामुळं पंतप्रधान मोदी आता दाखवत असलेलं प्रेम खोटं आहे”, अशीही टीका संजय राऊत यांनी केली.
“तोपर्यंत भाजपा – शिवसेना एकत्र येऊ शकत नाही”, आदित्य ठाकरेंनी मांडली स्पष्ट भूमिका
त्यांच्या दारात आम्ही उभे राहणार नाही
उद्धव ठाकरे यांच्याबाबत जवळीक दाखवून मोदींनी उबाठा गटासाठी पुन्हा एकत्र येण्याची जागा निर्माण केली आहे का? असा प्रश्न यावेळी संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी आमच्यासाठी खिडकीच काय दरवाजे उघडले तरी आम्ही त्यांच्या दारात उभे राहणार नाहीत. महाराष्ट्रात स्वाभिमान नावाची गोष्ट शिल्लक आहे. याचा अर्थ नरेंद्र मोदी आता निवडणुकीत पराभूत होत आहेत, त्यांना बहुमत मिळत नाहीये. म्हणून ते आता फटी, दरवाजे आणि खिडक्या उघडण्याचा प्रयत्न करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य चर्चेत, “उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत, उद्या…”
नरेंद्र मोदी किंवा अमित शाह हे ब्रह्मदेव नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांवरही टीका केली होती. ज्यांना आपले कुटुंब सांभाळता आले नाही, ते राज्य काय सांभाळणार? असे मोदी म्हणाले होते. या टीकेचा समाचार घेताना संजय राऊत म्हणाले, उद्या भाजपाची सत्ता गेल्यानंतर यापेक्षा वाईट कलह त्यांच्या पक्षात निर्माण होणार आहे. हे लिहून ठेवा. नरेंद्र मोदी किंवा अमित शाह हे ब्रह्मदेव नाहीत. राम आणि कृष्णही आले आणि गेले. तिथे मोदी आणि शाह कोण?
बाळासाहेबांचे माझ्यावर कर्ज आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पण ज्याच्यावर कर्ज आहे तो अशाप्रकारे बाळासाहेबांनी निर्माण केलेली संस्था अशाप्रकारे मोडीत काढणार नाही. भले कितीही मतभेद झाले तरी कुणीही बाळासाहेबांची संस्था बुडविणार नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.