नवी मुंबईत एका पुरुषावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाशी येथे सोमवारी रात्री ३६ वर्षीय पुरुषाला बेशुद्ध करुन त्याच्यावर अत्याचार करण्यात आले. पीडित घरी जात असताना धुम्रपान करण्यासाठी थांबला असता अज्ञात पाच आरोपींनी त्याचं अपहरण करत लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
पीडित पुरुषावर अनेक सर्जरी कराव्या लागणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संशियत पाच आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “पीडित पुरुषाचं अपहरण करुन एका निर्जनस्थळी नेण्यात आलं होतं. पीडित घरी जाताना धुम्रपान करण्यासाठी थांबला असता त्याचं अपहरण करुन मारहाण करण्यात आली आणि नंतर लैंगिक अत्याचार केले”.
“खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी पीडित पुरुषावर अनेक शस्त्रक्रिया केल्या असून सध्या त्याला डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आलं आहे”, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित पुरुषाच्या नातेवाईकांनी संपर्क साधल्यानंतर मंगळवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. “आम्ही कलम ३७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, तपास सुरु आहे”, अशी माहिती वाशी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
“आम्ही आरोपींची माहिती घेतली असून पीडितने दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांचा शोध घेतला जात आहे. आम्ही जवळच्या परिसरात असणारे सीसीटीव्हीदेखील तपासत आहोत. लवकरच त्यांना अटक केली जाईल”, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान पीडितने पोलिसांना सांगितल्यानुसार, सर्व आरोपी २५ ते ३० वयोगटातील असून अंमली पदार्थाच्या प्रभावाखाली असल्याचं दिसत होतं असंही पोलिसांनी सांगितलं आहे.