scorecardresearch

सामूहिक बलात्काराने डोंबिवली हादरलं; ३० जणांनी मिळून १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर केले लैंगिक अत्याचार

डोंबिवली पूर्वेला मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला

सामूहिक बलात्काराने डोंबिवली हादरलं; ३० जणांनी मिळून १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर केले लैंगिक अत्याचार
(प्रातिनिधीक छायाचित्र)

डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली पूर्वेला मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची अल्पवयीन आहे. आरोपींचा शोध सध्या सुरु आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आला. डोंबिवलीच्या भोपर परिसरात ही घटना घडली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ३० आरोपींनी मिळून सामूहिक बलात्कार केला . आरोपींमधील २२ जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करताना व्हिडीओ काढला आहे. या व्हिडीओच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल केलं जात होतं. यानंतर मुलीला फार्म हाऊसवर नेऊन आरोपींकडून आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. बुधवारी हा सगळा प्रकार उघडकीस आला असून मानपाडा पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना दिल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मानपाडा पोलीस ठाण्याबाहेर तणावाचे वातावरण

आरपीआय व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौज फाटा तैनात केला आहे. आरोपींना कठोर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा राजकीय पक्षांनी दिला आहे.

आरोपीना आमच्या ताब्यात द्या

डोंबिवली सामूहिक बलात्कारातील आरोपींना आमच्या ताब्यात द्या,आम्ही त्यांची धिंड काढू, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिली आहे. चव्हाण यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात भेट दिल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी चव्हाण यांच्या सह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात आरोपी आमच्या ताब्यात द्या आशा घोषणा दिल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-09-2021 at 09:17 IST

संबंधित बातम्या