मिल्टन सौदिया
वसई तालुक्याच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या निसर्गरम्य किनाऱ्यांना उकिरडय़ाचे स्वरूप आले आहे. बेकायदा आणि अर्निबध रेती उपशामुळे वसईतील किनारे धोकादायक तर बनले आहेत, पण आता कचऱ्याच्या समस्येने किनारे काळवंडू लागले आहेत. कचरा उचलणारी कोणतीही यंत्रणा सध्या अस्तित्वात नसल्याने किनारा बकाल होऊ लागला.
पाचूबंदर-किल्लाबंदर, अर्नाळा किनाऱ्यावरील कचऱ्याच्या ढिगांचा सर्वात मोठा फटका मच्छीमारांना बसत आहे. मच्छिमारांना समोरचा कचरा तुडवत पुढे जावे लागत आहे. कचरा कुजण्यास सुरुवात झाल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. किनाऱ्यावरील काही हॉटेल, रिसॉर्टमधील कचरा या ठिकाणी टाकला जातो. याशिवाय स्थानिक नागरिकही घरातील कचरा किनारी आणून टाकतात. त्यामुळे दिवसेंदिवस यात भर पडत चालली आहे.
राजोडी, कळंब, नवापूर या ठिकाणी सध्या कचऱ्याचे ढीग जमले आहेत. यात काही पर्यटक कचऱ्याविषयी काळजी घेत नाहीत. काही भागांत कचराभूमी असल्याने शहरातील जास्तीत जास्त कचरा इथे आणला जातो. वाऱ्याने कचराभूमीतील कचरा पुन्हा किनारी येतो.
ग्रामपंचायत आणि विविध सामाजिक संघटनांना सोबत घेऊन किनारा स्वच्छता अभियान राबविण्यात येते. यात शालेय विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले जाते. परंतु सध्या ग्रामपंचायतींकडे अपुरी साधने असल्याने स्वच्छता अभियान पूर्ण क्षमतेने अभियान राबवणे शक्य होत नाही, अशी माहिती अर्नाळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेंद्र पाटील यांनी दिली.
कळंबच्या किनाऱ्यावर महाविद्यालयीन तरुण-तरुणींमध्ये जागृती व्हावी यासाठी किनाऱ्यावर ग्रामपंचायतीने सूचना फलक लावले होते. मात्र ते आता गायब झाले आहेत.
किनारा स्वच्छतेबाबत महापालिकेची स्वतंत्र अशी मोहीम नाही. मात्र, ज्या सामाजिक संघटना, मंडळे, बचतगट किंवा शाळा किनारा स्वच्छता अभियान राबवतात त्यांना महापालिकेमार्फत साहित्यसामुग्री, मनुष्यबळ पुरवून सहकार्य केले जाते.
-वसंत मुकणे, स्वच्छता निरीक्षक, पालिका.