अलिबाग तालुक्यातील आरसीएफ कंपनीच्या थळ प्रकल्पातून वायुगळती झाल्याने एक कामगारबाधित झाला, तर वरसोली, थळ, नवगाव परिसरातील अनेकांना या गळतीचा त्रास झाला. या घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला.
राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर लिमिटेड कंपनीच्या थळ येथील युरिया प्लान्टमध्ये शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही गळती झाली. युरिया प्लांटमधील टॉवर नंबर ११तून ही गळती झाल्याचे सांगण्यात आले, सुमारे १० ते १५ मिनिटे ही गळती सुरू होती, त्यानंतर मात्र गळती रोखण्यात प्रशासनाला यश आले. या वेळी प्रकल्पात काम करणाऱ्या श्रीरंग कटोर वायुबाधेमुळे बेशुद्ध पडले. त्यांच्यावर आरसीएफ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या गळतीनंतर थळ, नवगाव, वरसोली परिसरात उग्र वास पसरला होता. यामुळे लहान मुले आणि वृद्धांना डोळे चुरचुरणे, उलटय़ा होणे, श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगण्यात आले.