आई-वडिलांच्या अंत्यसंस्काला मुलगाच हवा ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आता परिवर्तित होत असून सातार्डा जाधव वाडीत एका मुलीनेच सकाळी गणिताचा एसएससी चा पेपर लिहून देत दुपारी आपल्या आईवर अंत्यसंस्कार केल्याची घटना घडली आहे .या घटनेने मुलीच्या धाडसाचे आणि तिला साथ देणाऱ्या समाजातील सुधारणावादी कार्यकर्त्यांचेही अभिनंदन केले जात आहे.                  

यासंदर्भातील वृत्त असे की सातार्डा जाधव वाडीतील सौ रुपाली राजन जाधव (वय ४८) या महिलेचे रविवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. तिच्या पश्चात पती आणि दोन मुलीच असल्याने तिचे अंत्यसंस्कार विधी कोणी करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता . मोठी मुलगी धनश्री ही देवसु तालुका पेडणे (गोवा) येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता दहावी शिकत असल्याने व सोमवारीच तिचा गणिताचा पेपर असल्याने एका बाजूला आईचे दुःख आणि दुसऱ्या बाजूला भविष्याचा प्रश्न असा असल्याने तिच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली होती.      

मात्र याच गावचे सुपुत्र आणि पेडणे गोव्यात स्थायी झालेले सामाजिक कार्यकर्ते तथा साहित्यिक चंद्रकांत जाधव यांनी ही बाब शाळेच्या प्रशासनाच्या  कानी घातली. प्रशासनाने सदर मुलीच्या घरी तातडीने भेट देत  मुलीचे सांत्वन केलं आणि परीक्षेचे महत्त्व हे विशद केले त्यानंतर मुलीला परीक्षेला नेण्याची आणि पुन्हा आणून सोडण्याची जबाबदारी घेतली त्यानुसार मुलीला स्वतः घेऊन जाऊन शाळा प्रशासनानेच पुन्हा आईच्या अंत्यसंस्काराला मुलीला आणूनही सोडले त्यामुळे सकाळी पेपर आणि दुपारी अंत्यसंस्कार पार पडले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलगी धनश्री हीच कुटुंबातील मोठी असल्याने तिच्या हस्ते आईचे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबाने घेतल्याने सकाळी पेपर झाल्यानंतर संध्याकाळी आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामीण भागात आईवर अंत्यसंस्कार करण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याने तिचे विशेषतः तिचे व तिला प्रवृत्त करणाऱ्या सर्व सुधारणावादी शिक्षक पालक ग्रामस्थ यांना धन्यवाद दिले जात आहेत.