हॉटेलमध्ये कामासाठी परप्रांतातून अपहरण करून मुली आणल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला. छत्तीसगडमधून अपहरण केलेल्या नऊ मुलींचा शहरातील अन्विता या नामांकित हॉटेलमध्ये विनापरवाना कामगार म्हणून वापर केला जात असल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले. यातील पाच मुली अल्पवयीन आहेत. पोलिसांनी सर्व मुलींना ताब्यात घेऊन छत्तीसगडमधील पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. तेथील पोलिसांचे पथक या मुलींना घेऊन रवाना झाले.
बीड शहरात जालना रस्त्यावर असलेल्या नामांकित अन्विता या हॉटेलमध्ये परराज्यातील नऊ मुली काम करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून मुली ताब्यात घेतल्या. यात हॉटेल मालकाने पोलीस अधीक्षक कार्यालयासह कामगार कार्यालयातही कोणतीही नोंद न करता मुलींना कामावर ठेवल्याचे तपासणीत समोर आले. त्यात पाच मुली तर अल्पवयीन असल्याचेही स्पष्ट झाले. हॉटेल मालक व व्यवस्थापकाची चौकशी केल्यानंतर या मुली छत्तीसगडमधून आल्याचे सांगितले. बीड पोलिसांनी छत्तीसगड पोलिसांशी संपर्क केल्यानंतर काकेर व बस्तर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात मुलींच्या अपहरणाचे गुन्हे नोंद असल्याचे स्पष्ट झाले. छत्तीसगड पोलिसांची एक टीम बीडला दाखल झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक के. आर. दिवाण, पोलीस उपनिरीक्षक सुषमा वर्मा, श्रम निरीक्षक महेश देवोगण यांनी अधिक चौकशी केली असता एक मुलगी हॉटेल मालकाच्या घरीही कामावर असल्याचे समोर आले. छत्तीसगड व पोलिसांच्या मध्यस्थीने पाच महिन्यांच्या थकीत पगारापोटी हॉटेल मालकाने या मुलींना ३ लाख ३९ हजार रुपयांचा धनादेश दिला. ४ एप्रिल रोजी रात्री उशिरा हे पथक मुलींना घेऊन छत्तीसगडकडे रवाना झाले. दरम्यान काकेर येथील सुलमार सालार नावाच्या व्यक्तीने या मुलींना बीडमध्ये पाठवले होते. या प्रकरणात सालार याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्तीसगड येथे गेल्यानंतर तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून या संदर्भात गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक के. आर. दिवाण यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 6th Apr 2015 रोजी प्रकाशित
हॉटेलमध्ये कामासाठी छत्तीसगडमधून मुलींचे अपहरण
हॉटेलमध्ये कामासाठी परप्रांतातून अपहरण करून मुली आणल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला. छत्तीसगडमधून अपहरण केलेल्या नऊ मुलींचा शहरातील अन्विता या नामांकित हॉटेलमध्ये विनापरवाना कामगार म्हणून वापर केला जात असल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले.

First published on: 06-04-2015 at 01:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girls kidnap in chhattisgarh for hotel work