हक्काच्या जागेतून बेदखल केल्याची तक्रार करत शासकीय अध्यापिका महाविद्यालयातील प्राचार्यासह विद्यार्थिनींनी मंगळवारी शासकीय कन्या विद्यालयात धडक देऊन मुख्याध्यापिकेस घेराव घातला. त्यांना रोखण्यासाठी महिला पोलिसांनी बळाचा सौम्य वापर केल्यामुळे उडालेल्या गोंधळात चार विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली. जिल्हा परिषदेच्या जागेतील हा वाद इतका चिघळूनही संबंधित यंत्रणा वा शिक्षण विभागाचा एकही जबाबदार अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही.
शहराच्या मध्यवर्ती भागात शासकीय कन्या विद्यालय आणि शासकीय अध्यापिका महाविद्यालय यांची संयुक्त इमारत आहे. या जागेच्या वादातून ही धुमश्चक्री उडाली. इमारतीच्या दुरूस्तीचे कारण देऊन कन्या विद्यालयाने फेब्रुवारी महिन्यात अध्यापक महाविद्यालयाचे दहा वर्ग लगतच्या सर्व शिक्षा अभियानच्या इमारतीत स्थलांतर केले होते. दुरूस्तीचे काम झाल्यावर कन्या विद्यालयाने उपरोक्त दहा वर्गावर कब्जा करत अध्यापक महाविद्यालयास हक्काच्या जागेपासून वंचित ठेवल्याचा विद्यार्थिनींचा आक्षेप आहे. सध्या ज्या जागेत अध्यापिका महाविद्यालयाचे वर्ग भरतात, ती अतिशय अडचणीची जागा असल्याने इमारतीतील वर्ग मिळावे म्हणून संबंधितांकडून गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, कोणीही दाद देत नसल्याने वैतागलेल्या अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या सरोज जगताप व विद्यार्थिनींनी सायंकाळी कन्या महाविद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका ज्योती चौधरी यांच्या दालनात धडक देत त्यांना घेराव घातला.
दरम्यानच्या काळात पोलीस यंत्रणाही दाखल झाली. महिला पोलिसांनी विद्यार्थिनींना समजावून दालनाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यामुळे नाईलाजास्तव त्यांना बळाचा वापर करावा लागला. त्यास जगताप यांनी आक्षेप घेतला असता महिला पोलीस व त्यांच्यात झटापट झाली. या घडामोडींमुळे काही विद्यार्थिनी बेशुद्ध पडल्या तर काहींची प्रकृती बिघडली. त्यात सोनाली जाधव, सरला मोरे, मंदाकिनी पाटील व हर्षदा सोनवणे या विद्यार्थिनींचा समावेश आहे. त्यातील काही विद्यार्थिनींना लगेच जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या गोंधळात दालनात अडकलेल्या चौधरी यांनाही बाहेर काढण्यात आले.
अध्यापिका महाविद्यालयाच्या वर्गामध्ये कन्या विद्यालयाने इयत्ता पहिली ते चवथीपर्यंतचे वर्ग सुरू करून आमच्या वर्गावर कब्जा केल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. स्थलांतरीत केलेल्या जागेत बसण्याची व्यवस्था नसल्याने बाहेर बसून अभ्यास करावा लागतो. त्यात ४० हजार रूपयांचे वीज देयक थकल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी, दैनंदिन अध्यापनातही अडचणींचा सामना करावा लागत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.