पेण अर्बन बँकेतील ठेवीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी भारतीय राष्ट्रीय निर्माण विकास मंडळाने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ७०० कोटींच्या घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या ७५ वर्षांच्या या सहकारी बँकेसाठी आशेचा किरण जागृत झाला आहे. राष्ट्रीय निर्माण विकास मंडळाचे अध्यक्ष  कमलजी गोविल  यांनी बँकेला पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.  संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे पेण अर्बन बँकेत तब्बल सातशे कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. या घोटाळ्यामुळे सुमारे ४० हजार ठेवीदारांच्या कोटय़ावधी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्या होत्या. बँक त्यामुळे ठेवीदारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते. बँकेच्या विलीनीकरणासाठी ठेवीदार संघर्ष समितीकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. मात्र त्याला फारसे यश येत नव्हते. आता मात्र बँकेसाठी तसेच ठेवीदारांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. बँकेच्या विलीनीकरणासाठी भारतीय राष्ट्रीय निर्माण विकास मंडाळाने पुढाकार घेतला आहे.
पेण अर्बन बँकेचे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. ते संपल्यावर बँकेला आमच्या संस्थेकडून ताब्यात घेतले जाईल. बँकेचे पुनरुज्जीवन करताना हजारो ठेवीदारांना योग्य न्याय दिला जाईल, असे आश्वासनही राष्ट्रीय निर्माण विकास मंडळाचे अध्यक्ष कमलजी गोविल यांनी सांगितले. यासाठी बँकेचा पूर्ण अभ्यास करून पुनरुज्जीवनासाठी संस्थेने अहवाल तयार केला असल्याचे त्यांनी सांगितले. पेण अर्बन बँकेचे नाव न बदलता पुनरुज्जीवन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 दरम्यान, राष्ट्रीय निर्माण विकास मंडळाने दिलेल्या या प्रस्तावाचे ठेवीदार संघर्ष समितीने स्वागत केले आहे. बँकेचे पुनरुज्जीवन करताना संचालक मंडळात जुन्या संचालकांना स्थान देऊ नये.
ठेवीदारांचे प्रतिनिधी संचालक मंडळावर असावेत. बँकेकडे जमा असणारी साडेसात कोटींची सहकारी संस्थांची रक्कम आधी देण्यात यावी, त्यानंतर ठेवीदारांचे पैसे व्याजासह देण्यात यावेत, यासारख्या मागण्या ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी केल्या आहेत. ठेवीदारांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे एनएफसीडीने मान्य केले आहे. या प्रस्तावामुळे बँकेतील ठेवीदारांसाठी आशेचा किरण पुन्हा एकदा जागृत झाल्याचे बोलले जाते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

More Stories onस्कॅमScam
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Glimmer of hope for pen urban bank
First published on: 31-01-2013 at 05:37 IST