कोकण विभागाच्या पंधरा विधानसभा मतदारसंघांची भाजपने गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. त्यामुळे गोवा राज्यातील मंत्री व भाजपचे पदाधिकारी सावंतवाडीपासून पनवेलपर्यंत सध्या भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारात गुंतले आहेत.
भाजप गोवा राज्यात वाढविण्यासाठी स्व. प्रमोद महाजन व स्व. गोपीनाथ मुंडे यांनी लक्ष दिले होते. त्याचा फायदा आम्हाला गोवा राज्यात झाला. त्यामुळे स्वबळावर महाराष्ट्रात भाजप लढत असल्याने आम्ही महाराष्ट्र भाजपच्या मदतीला आलो आहोत, असे गोवा राज्याचे आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.
भाजपचे सावंतवाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर आहे. या मतदारसंघात आपण फिरत असताना लोकांचा मोठा उत्साह दिसत आहे. तसेच गोव्याचे मंत्री असूनही आपल्या स्वागतासाठी लोकांची गर्दीही होत आहे, असे पार्सेकर म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्हा गोव्याच्या जवळचा नातेसंबंध सांगणारा आहे. गोवा राज्याने पेट्रोलवरील व्हॅट कमी केल्याने पेट्रोल स्वस्त आहे. त्यामुळे सिंधुदुर्गच्या हद्दीवरील लोक गोव्यात स्वस्त पेट्रोलसाठी येतात तसेच गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात सिंधुदुर्गच्या रुग्णांची गर्दी असते. त्यामुळे गोवा राज्याबाबत लोकांत आपुलकी आहे, असे लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले.
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सिंधुदुर्गच्या हद्दीवर असून येत्या तीन वर्षांत विमानतळ होईल. त्याचा मोठा फायदा सिंधुदुर्गला होणार आहे. सिंधुदुर्गच्या हद्दीलगत धारगळ येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मेडिकल संशोधन रुग्णालयही होत आहे. या उच्च दर्जाच्या रुग्णालयाचा फायदाही गोवा राज्यासोबत सिंधुदुर्गवासीयांना होईल, असे लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले.
भाजप २२ वर्षांनंतर स्वबळावर लढत आहे. त्यामुळे भाजपची कोकण विभागात ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच आम्ही गोवा राज्य सोडून कोकणाची जबाबदारी घेतल्याचे ते म्हणाले.