बेळगावच्या गोकाक तालुक्यातील होसुर गावात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली. दोन्ही मुलांना गळफास लावून नंतर पती, पत्नीने एकाच दोऱ्याने फास लावून घेतल्याची माहिती आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. गोकाक पोलीस घटनेचा कसून तपास करत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भिमाप्पा सिद्धप्पा चुनप्पगोळ (३०), मंजुळा चुनप्पगोळ (२५), प्रदीप (८) आणि मोहन (६) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. भिमाप्पा यांनी पहिल्यांदा आपल्या दोन्ही मुलांना गळफास लावून त्यांचे जीवन संपवले. त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर भिमाप्पा यांनी आणि त्यांची पत्नी मंजुळा चुनप्पगोळ या दोघांनी फास घेत जीवनयात्रा संपवली.

भिमाप्पा हे सिंडिकेट बँकेत गार्ड म्हणून काम करत होते. नैराश्यातून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र या आत्महत्येमागे नेमके कारण कोणते याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नसून पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत. सिंडिकेट बँकेत गार्डचे काम करणारे भिमाप्पा चुनप्पगोळ हे कर्जबाजारी झाले होते का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत. तपासानंतरच आत्महत्येचं नेमकं कारण कळण्यास मदत होणार आहे.