२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत शिवसेना ( ठाकरे गट ) संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी उत्तम चेहरा आहेत, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. संजय राऊतांच्या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तर, यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊतांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “संजय राऊत वेडे झाले आहेत. पवारांच्या हातात हात घालून शिवसेनेची राखरांगोळी केल्यानंतरही हा माणूस शांत बसण्यास तयार नाही. रोज वेगवेगळी विधान करणं, विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणं, निवडणूक आयोगाला अर्वाच्च भाषेत बोलणं सुरु आहे.”
हेही वाचा : आधी ठाकरेंना घरचा आहेर, आता खासदार बंडू जाधवांनी केलं मोठं विधान; म्हणाले, “ज्या दिवशी…”
“संजय राऊत सांगलीत गेल्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागताला उपस्थित होते. यांची परिस्थिती म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा, अशी झाली आहे. हे एकमेकांना संभाळून घेत आहेत. राज्याचं राहिलं हे लोकं देशाची भाषा बोलत आहे. कृपामाई रुग्णालयात खूप चांगलं आहे. तिथे राऊतांना दाखल करण्याची नितांत गरज आहे,” असा टोला गोपीचंद पडळकरांनी लगावला आहे.
हेही वाचा : मुंबई, नागपूरात ईडीची धडक कारवाई! कोट्यवधी रूपयांची रक्कम आणि दागिने जप्त
भाजपाला गल्लीतलं कुत्र विचारत होतं का? असं विधान उद्धव ठाकरेंनी खेडमधील सभेत केलं होतं. याबद्दल विचारलं असता गोपीचंद पडळकरांनी सांगितलं, “भाजपा अखंड देशभर आहे. ती महाराष्ट्रापुरती मर्यादीत नाही. उद्धव ठाकरेंकडे कोणतीही दूरदृष्टी राहिली नाही. त्यांना फक्त भाजपा आणि वरिष्ठ नेत्यांवर तोंडसुख घ्यायचं यापलिकडे काय येत नाही. आतासुद्धा त्यांनी शहाणं होतं, चांगला विचार केला पाहिजे. त्यांच्या बोलण्याने काही फरक पडणार नाही,” असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलं.