राष्ट्रवादीने प्रतिष्ठा पणाला लावूनही भाजपचे गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीत तब्बल १ लाख ३६ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला. मुंडेंच्या नाथ्रा गावातून एकतर्फी मतदान घेतल्यामुळे पुतणे आमदार धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादीला एक तरी मतदान जास्त मिळवून देण्याचा दावा फोल ठरला, तर जामगावमधून राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांनी आपली आघाडी कायम ठेवली. मुंडे लाटेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आपल्या गावातही पक्षाच्या उमेदवाराला जास्तीचे मतदान देऊ शकले नाहीत. इतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मात्र आपल्या गावात आपले वर्चस्व राखल्याचे मतावरून दिसून येते.
बीड लोकसभा मतदारसंघात मुंडे यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीच्या डझनभर आमदार-मंत्र्यांनी राजकीय ताकद पणाला लावली. प्रचारसभातून आमदार धनंजय मुंडे परळी मतदारसंघातून राष्ट्रवादीला मताधिक्य देऊ. पण मुंडेंचे जन्मगाव नाथ्रा (तालुका परळी) येथून एक तरी मतदान जास्त देऊ, असा दावा केला होता. मात्र, मतदारांनी मुंडे यांना ७४०, तर सुरेश धस यांना ३९१ मते दिली. साहजिकच आमदार मुंडे यांचा दावा फोल ठरला.
धस यांच्या जामगाव (तालुका आष्टी) येथे धस यांना १ हजार ६०३, तर मुंडे यांना केवळ १६ मते मिळाली. त्यामुळे दोन्ही गावांतील मतदारांनी आपल्या भूमिपुत्राला साथ देण्याची भूमिका बजावली, तर मुंडे लाटेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक डक यांना आपल्या सोन्नाथडी (तालुका माजलगांव) येथे पक्षाच्या उमेदवाराला आघाडी मिळवून देण्यात यश आले नाही. मुंडेंना ५६०, तर धस यांना ३४३ मते मिळाली. भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्या गावात मुंडेंना ३०५, तर धस यांना २२० मते मिळाली.
राष्ट्रवादीचे दोन आमदार असलेल्या आमदार बदामराव पंडित व अमरसिंह यांच्या दैठणा (तालुका गेवराई) गावात मुंडेंना २३१, तर धस यांना ८४४ मते मिळाली. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नवगण राजुरी (तालुका बीड) येथे धस यांना ४ हजार ४९६ मतदान झाले. या तुलनेत मुंडेंना राजुरीतून केवळ ३०९ मतांवर समाधान मानावे लागले. माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या मोहखेड (तालुका माजलगाव) गावात ७७२ मते धस यांना, तर मुंडे यांना केवळ २४२ मतांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीचे रमेश आडसकर यांच्या आडस (तालुका केज) गावात धस यांना १ हजार ७८१, तर मुंडे यांना १ हजार ५३९ मतदान झाले.
बीड पंचायत समितीचे सभापती काकासाहेब जोगदंड यांच्या देवी बाभुळगाव गावातही धस यांना ३१२, तर मुंडेंना २५७ मते मिळाली. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आर. टी. देशमुख यांच्या मोहा (तालुका परळी) गावात मुंडे यांना ८५०, तर धस यांना ७३४ मते मिळाली. शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पालवण (तालुका बीड) गावातही मुंडेंना ५०८, तर धस यांना ४२४ मते मिळाली. पुढाऱ्यांनी आपल्या गावातून आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला अधिक मते देऊन आपली प्रतिष्ठा कायम राखली.
संग्रहित लेख, दिनांक 21st May 2014 रोजी प्रकाशित
नाथ्रामध्ये मुंडेच पुढे, पुतण्याचा दावा फोल!
मुंडेंच्या नाथ्रा गावातून एकतर्फी मतदान घेतल्यामुळे पुतणे आमदार धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादीला एक तरी मतदान जास्त मिळवून देण्याचा दावा फोल ठरला, तर जामगावमधून राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांनी आपली आघाडी कायम ठेवली.

First published on: 21-05-2014 at 01:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gopinath munde ahead in nathra