महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे दिला जाणारा ‘गौरवमूर्ती’ पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर नरहर रसाळ यांना जाहीर झाला आहे. वाङ्मयीन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. ५० हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी डॉ. रसाळ यांनी साहित्य अकादमीमध्ये मराठी भाषेचे प्रतिनिधित्व केले. मराठवाडा साहित्य परिषदेचा पहिला जीवनगौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला. या पूर्वी त्यांना अशोक कीर्तकीर, पद्मजा बर्वे, साहित्य समीक्षा, चारठाणकर प्रतिष्ठान, राज्य शासनाचा आदर्श शिक्षक, प्रा. रा. श्री. जोग आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. गेल्या ५६ वर्षांपासून ते मराठी वाङ्मयाची समीक्षा करीत आहेत. साहित्यविषयक लेखन, समीक्षा लेखन, संपादनात त्यांचा हातखंडा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांनी विभागप्रमुख म्हणून काम केले आहे.