”विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे. पुरग्रस्त भागात आम्ही पाहणी दौरा केला. शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे वाहून गेली आहे. घरं पूर्णपणे नष्ट झाली आहेत. जनावरांचे गोठे नष्ट झाले असून, अनेक जनावरं वाहून गेली आहेत. मात्र सरकारचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. पुरग्रस्तांना तातडीची मदत नाही, रेशन नाही, तात्पुरते निवारे नाही. मुळात या पुरपरिस्थीती दरम्यान सरकारचे अस्तित्वच नाही असे चित्र दिसत आहे. असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज ब्रम्हपूरी तालुक्यातील काही पुरग्रस्त गावांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेटी देत पाहणी दौरा केला. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आमदार किर्तीकुमार भांगडीया, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, जिल्हा भाजपाचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषद सदस्य संजय गजपूरे आदींची उपस्थिती होती.

२०१९ मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीदरम्यान उध्दव ठाकरे बांधावर गेले आणि २५ हजार रूपये हेक्टरी मदत द्या, अशी मागणी केली होती. मात्र आज सरकारमध्ये आले आणि पुरग्रस्तांना मदत देण्यासाठी अजून साधी घोषणा सुध्दा केली नसल्याचे सांगून, शासनाने त्वरीत पुरग्रस्तांना मदत जाहीर करावी. अशी मागणी यावेळी फडणवीस यांनी केली. २९ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयातील मदती संबंधीच्या तरतूदी तातडीने लागू करण्याची देखील मागणी त्यांनी यावेळी केली.

यावेळी बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनावरांसाठी ४० हजार टन चारा वितरीत करण्याची घोषणा केली. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे पंचनामे करण्याची पध्दत वेळकाढू असते, त्यामुळे या पंचनाम्याच्या प्रक्रियेवर अंकुश ठेवण्यासाठी व पुरग्रस्तांना योग्य न्याय मिळावा, यासाठी भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित राहतील, असेही त्यांनी जाहीर केले. पुरग्रस्त गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्वरीत निर्जंतुकीकरणाची कामे हाती घेण्यात येईल. तसेच बोअरवेल दुरूस्तीसाठी त्वरीत पथक पाठविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government does not exist during flood situation fadnavis msr
First published on: 03-09-2020 at 21:43 IST